फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा, मी पुराव्यांचा पेन ड्राइव्ह बाहेर काढतो; देशमुखांचे 'ओपन चॅलेंज'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:43 PM2024-07-25T16:43:48+5:302024-07-25T16:46:27+5:30
मी जे काही बोललो, फडणवीसांवर आरोप केले, त्याबाबतचे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये पुरावे आहेत, असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे.
Anil Deshmukh ( Marathi News ) : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढत चालली आहे. फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केल्यानंतर आज देशमुख यांनीही प्रसारमाध्यमांसमोर येत फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात आरोप करून प्रतिज्ञापत्र देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. याबाबत मी काल वक्तव्य केलं होतं. मी पुराव्याशिवाय कोणतंही वक्तव्य करत नाही. मी जे काही बोललो, फडणवीसांवर आरोप केले, त्याबाबतचे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये पुरावे आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना काल माझ्यावर जो आरोप केला आणि सांगितले की मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलल्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. माझं फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी ते व्हिडिओ सार्वजनिक करावेत," असं आव्हान देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझे कोणतेही व्हिडिओ नाहीत, फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते तसे बोलले आहेत. मात्र माझ्यावर वेळ आल्यानंतर किंवा कोणी मला चॅलेंज केल्यानंतर मी पेन ड्राइव्हमधील पुरावे सर्वांसमोर आणणार आहे," अशा शब्दांत देशमुख यांनी फडणवीसांना अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला आहे.
फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
"मी एखाद्यावर राग ठेवून राजकारण करत नाही. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही. अनिल देशमुख यांच्या पक्षाच्याच काही लोकांनी मला ऑडिओ-व्हिडिओ आणून दिले आहेत. त्यात अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंबाबत काय बोललेत, शरद पवार यांच्याबाबत काय बोललेत, सचिन वाझेवर काय बोललेत, हे सगळं आहे. माझ्यावर वेळ आली के हे व्हिडिओ मी सार्वजनिक करणार आहे," असा इशारा काल देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांची चौकशी लागली तेव्हा राज्यात आमचं सरकार नव्हतं. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर अनिल देशमुख यांची चौकशी लागली आणि हायकोर्टाने देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला लावला. महाविकास आघाडी सरकारमध्येच देशमुख यांच्याविरोधात एफआरआर झाला आणि ते तुरुंगात गेले. देशमुख हे निर्दोष म्हणून तुरुंगाबाहेर आले नसून ते जामिनावर बाहेर आहेत," असा पलटवार फडणवीसांनी काल केला होता.