Devendra Fadnavis slams MVA: "तेव्हाच ठरवलं होतं 'मविआ'च्या लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही"; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 05:36 PM2022-07-23T17:36:53+5:302022-07-23T17:37:58+5:30
फडणवीसांनी महाविकास आघाडी वर सडकून टीका केली
Devendra Fadnavis slams MVA: भाजपाची पनवेलमध्ये सुरू असलेली कार्यकारिणीची बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजवली. त्यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी राज्यातील मावळत्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. "मविआ सरकारच्या लोकांनी सगळे प्रकल्प बंद पाडले. महाराष्ट्राची जी अवस्था होती त्यासाठी प्रश्न पडला की सरकार कशासाठी... मग पहिल्याच दिवशी मनात गाठ बांधली की सरकार केवळ बदला घेण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी सत्तेत असेल, तर तेव्हाच ठरवलं होतं की या महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना एक दिवसही शांत झोपू द्यायचं नाही", अशा शब्दांत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
" महाविकास आघाडीच्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांवर केसेस केल्या. पण कोणी घाबरलं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्ष फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात तर घर तोडू, खूप ठिकाणी पोलिस स्थानकात फिरवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. पण आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेर आता खुला श्वास घेत बैठक होतेय आणि महाराष्ट्राची जनता खुला श्वास घेतेय", असेही फडणवीसांनी स्पष्ट केला.
"मविआ सरकार नेमकं कोण चालवतंय... भगवानभरोसे हे सरकार सुरू होतं. त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली. आपण हे सत्तेकरिता परिवर्तन केलेलं नाही. महाविकास आघाडी आल्यावर गती कमी झाली नाही तर नुसत्या स्थगिती देण्यात आल्या. आम्ही खूर्चीचा कधी विचार केला नाही, परिवर्तन व्हावं हेच महत्त्वाचं होतं. महाराष्ट्रात आश्चर्य घडलं. सत्तेत ताकद असते. ते चुंबक आहे. पण राज्यात ५० आमदारांनी सरकार सोडून विरोधी पक्षात येण्याचा निर्णय घेतला ही मोठी गोष्ट आहे", असेही त्यांनी अधोरेखित केले.