"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:39 PM2024-05-07T21:39:14+5:302024-05-07T21:43:48+5:30
Devendra Fadnavis vs Sharad Pawar, Maratha Reservation: मराठा आंदोलन सुरु असताना काही वॉर रूम्स तयार करण्यात आल्या होत्या. त्या वॉर रूम्सचा आंदोलनाशी संबंध नव्हता. केवळ मला टार्गेट करण्यासाठीच बनवल्या त्या होत्या आणि यामागे शरद पवार गटातील नेतेमंडळी होती, असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला.
Devendra Fadnavis vs Sharad Pawar, Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनातील महत्त्वाचे नाव. जरांगे पाटील यांनी मधल्या काळात अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाच्या शब्दांत टीका केली होती. जरांगे यांच्या त्या आरोपांवर फडणवीसांनी त्यावेळी उत्तर दिले होते. परंतु, नुकतेच एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी काही खुलासे केले. मराठा आंदोलन सुरु असताना काही वॉर रूम्स तयार करण्यात आल्या होत्या. त्या वॉर रूम्सचा आंदोलनाशी संबंध नव्हता. केवळ मला टार्गेट करण्यासाठीच बनवल्या त्या होत्या आणि यामागे शरद पवार गटातील नेतेमंडळी होती, असा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला.
"आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन सुरु केले. त्यावेळी काही लोकांनी त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मला त्यांच्याबद्दल पुराव्यासह सगळी माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वॉर रूम्स तयार केल्या होत्या. जरांगे पाटील यांनाही त्या गोष्टीची माहिती नव्हती. या वॉर रूम्सवरून एकच काम होतं, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं. त्या वॉर रूम्समधून जो काही कंटेन्ट क्रिएट होत होता, तो सोशल मीडियावर व्हायरल होत होता, त्याद्वारे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही त्या वॉर रूम्स शोधून काढल्या. त्या वॉर रूम्स नंतर छत्रपती संभाजीनगरमधून नवी मुंबईत हलवण्यात आल्या होत्या. आम्ही त्या देखील शोधून काढल्या आणि मग मात्र हा सोशल मीडिया पोस्टचा खेळ बंद झाला. त्या पोस्ट या आंदोलनाशी संबंधित नव्हत्या. त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती," अशा खुलासा फडणवीसांनी केला.
"मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. ते या लोकांना पाहावलं नाही. अनेक वर्षे काही लोक मराठा समाजाचे ठेकेदार झाले होते. परंतु, मी मराठा समाजासाठी काम करू लागल्यानंतर यांचं राजकारण उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या हे लक्षात आल्यावर, त्यांनाही प्रश्न विचारले जातील अशी भीती त्यांना होती. तुम्ही ५० वर्षे मराठा समाजाचं राजकारण केलं, पण फडणवीस यांनी पाच वर्षात समाजासाठी इतकं काम केलं, असंच काम तुम्ही का केलं नाही? या प्रश्नाची भीती काहींच्या मनात होती. त्यामुळे माझ्याबद्दल मनात राग आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण टार्गेट हा त्यांचा विचार सुरु झाला. कारण फडणवीसांना टार्गेट केलं नाही तर आपली जी प्रतिमा खराब झाली आहे, ती सुधारणार नाही, हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांनी समाजमाध्यमांवर काही ट्रेन्ड सुरू केले होते. पण तो कृत्रिम होता, तो ऑर्गनिक नव्हता. त्यामुळे तो ट्रेन्ड टिकू शकला नाही," असेही फडणवीस म्हणाले.