"शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:13 PM2024-08-28T17:13:37+5:302024-08-28T17:14:05+5:30

महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर केली होती टीका

Devendra Fadnavis slams Sharad Pawar over Corruption statement regarding Shivaji Maharaj Statue News | "शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर

"शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही"; देवेंद्र फडणवीसांचे टीकेला चोख प्रत्युत्तर

Devendra Fadnavis slams Sharad Pawar: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या ( Shivaji Maharaj Statue News ) प्रकरणी सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. विविध नेतेमंडळी यावर आपले मत मांडत आहेत. तसेच काही बडे नेते घटनास्थळी जाऊन पाहणीही करत आहेत. आज सकाळी उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी गेले असता, नारायण राणे यांच्या समर्थकांचा ठाकरे समर्थकांशी राडा झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, 'कुठल्या गोष्टीत भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही', असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

शरद पवारांनीहीभ्रष्टाचाराला विरोध करायला हवा!

"शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळा राज्य सरकारने नव्हे तर नेव्हीने तयार केला होता हे त्यांना माहिती आहे. एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे तारतम्य आणि दुसरीकडे नको असं कसं म्हणता येईल. भ्रष्टाचार कुठेच नको. भ्रष्टाचाराला साऱ्यांचा विरोधच असला पाहिजे. शरद पवारांनीही भ्रष्टाचाराला विरोध करायला हवा. जर ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असतील तर मला आश्चर्य वाटते. मग ते इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? अशी राजकीय वक्तव्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिली जात आहेत. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचे वक्तव्य करणे शोभत नाही,"

प्रत्येक गोष्टीत विरोधकांनी राजकारण करु नये!

"छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना ही सर्वांनाच कमीपणा आणणारी आहे. याबाबत कुणीही राजकारण करु नये. अशा घटनेनंतर योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी आणि महाराजांचा भव्य पुतळा उभारला जायला हवा. नेव्हीने चौकशी समिती तयार केली असून ती टीम तेथे येऊन गेली आहे. त्यांची टीम योग्य ती कारवाई करत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नेव्हीच्या सहाय्याने लवकरच महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. पण विरोधक प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. प्रत्येक घटना निवडणुकींच्या नजरेतून पाहत आहेत, हे चुकीचे आहे. असे खालच्या दर्जाचे राजकारण करु नये. सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे," अशी माहिती फडणवीसांनी दिली.

Web Title: Devendra Fadnavis slams Sharad Pawar over Corruption statement regarding Shivaji Maharaj Statue News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.