राज्यात बदल्यांचा धंदा सुरू झालाय, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:14 PM2020-09-02T18:14:31+5:302020-09-02T18:23:11+5:30
पूर्व विदर्भात पूराने धुमाकूळ घातला आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते.
नागपूर : राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. कोरोनाचा मृत्यूदरही वाढत आहे. या संकटाला सामोरे जाण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशा शब्दांत टीका करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल उपस्थित केला आहे. पूर्व विदर्भात पूराने धुमाकूळ घातला आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
राज्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. कोरोनामुळे मृत्यूदरही वाढत आहे. अशावेळी राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल, यामध्ये गुंग झाले आहेत. कोरोनाच्या काळात बदल्या करणे इतके महत्त्वाचे आहे का?, एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता?, असा सवाल करत राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात १८ ते २० लाख कर्मचारी आहेत. मात्र, ही संख्या ७ ते ८ लाख एवढी जरी पकडली आणि त्यातील १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आकडा जरी काढला तरी ही संख्या खूप मोठी होते. कोरोनाच्या काळात १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेणे हे चुकीचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याचबरोबर, बदली केल्यावर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला भत्ता द्यावा लागतो. त्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च येतो. कोरोनामुळे राज्यात आर्थिक संकट असताना बदल्यांचा खर्च वाढविण्याची काय गरज होती?, असा सवाल करत काही अत्यंत महत्त्वाच्या बदल्या केल्या असत्या तरी चालल्या असत्या, पण सरसकट बदल्या करणे योग्य नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना चाचण्या तातडीने वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यात सद्यस्थितीत प्रत्यक्षात १ लाख ९८ हजार ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे कालच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. राज्यात कोरोना मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. दैनंदिन नवीन कोरोना बाधित रुग्णांचा आकडाही गेल्या तीन दिवसांपासून १५ हजारच्या वरच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.
याशिवाय, अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्यात खाटांची क्षमता अधिक वाढवणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करुन देणे, अशा सूचनांचा यात समावेश आहे.
आणखी बातम्या...
- पीएम केअर्स फंडमध्ये पहिल्या 5 दिवसांत 3,076 कोटी; बाकीचा हिशोब मार्चनंतर...
- कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली
- तरुणांना भाषण नको, नोकऱ्या पाहिजेत; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम
- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती
- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा