"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 08:01 PM2024-11-15T20:01:25+5:302024-11-15T20:04:11+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे फॅक्टर आहेत आणि राहतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप काँग्रेसला जास्त का लक्ष्य करत आहे, याबद्दल भूमिका मांडली.
Devendra Fadnavis Sharad Pawar News: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांसह भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांवर थेट टीका केली होती. त्याचा फटका बसल्याचे अजित पवारांनी निकालानंतर बोलून दाखवले. विधानसभा निवडणुकीत भाजप शरद पवारांवर टीका करताना खबरदारी घेत असल्याचे दिसत आहे. याची राजकीय वर्तुळात आणि राज्यात चर्चा होत आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली.
आजतक वृत्तवाहिनीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार एक मोठा फॅक्टर होते आणि आताही आहेत, असं तुम्ही मानता का? आणि त्यामुळे तुमची पार्टी त्यांच्यावर विचारपूर्वक टीका करत आहे का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
शरद पवार महाराष्ट्रात फॅक्टर का?
या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बघा महाराष्ट्रात शरद पवार नेहमी फॅक्टर राहिले आहेत आणि राहतील. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढं माझं वय आहे, तितकं त्यांची राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं राजकारण कळतं. महाविकास आघाडी तयार झाली आहे, ती शरद पवारांनी तयार केलेली आहे."
शरद पवारांवर टीका करताना भाजपची सावध भूमिका का? फडणवीस म्हणाले...
"शरद पवारजी हेच महाविकास आघाडीला चालवतात. कधी उद्धव ठाकरेंना पुढे करतात. कधी काँग्रेसला पुढे करतात. तर रिमोट कंट्रोल पवारांच्याच हातात आहे. बघा, असं आहे की, यावेळी मूळात आमची लढाई काँग्रेसच्या विरोधात आहे", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
"सर्वात मोठ्या पक्षाच्या रुपात काँग्रेस लढत आहे. भाजपची सर्वात जास्त जागांवर लढाई काँग्रेस विरोधात आहे. त्यामुळे आमचा थेट हल्ला काँग्रेसविरोधात असेल. जिथे आम्ही शरद पवारांच्या पक्षाच्या विरोधात लढतोय, तिथे आम्ही त्यांच्यावर बोलतो. पण, आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढतोय. त्यामुळे आम्हाला काँग्रेसलाच लक्ष्य करावं लागेल. काँग्रेस खरा चेहरा दाखवावा लागेल आणि तेच आम्ही करत आहोत", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.