शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:02 PM2023-05-02T13:02:39+5:302023-05-02T13:03:09+5:30
शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं.
मुंबई - २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळाले. एकीकडे मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात बिनसल्यानंतर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची चर्चा सुरू होती. पण अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाल्याच्या बातम्या झळकल्या आणि राजकीय भूकंप घडला. मागील अडीच वर्षापासून पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक रहस्य आजही उलगडले नाहीत. परंतु शरद पवारांनी त्यांच्या लोक माझे सांगती या राजकीय आत्मकथेच्या दुसऱ्या भागात यावर भाष्य केले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांचे पुस्तक मी वाचले नाही. त्यामुळे त्यावर कमेंट्स करणार नाही. पण तो जो सर्व एपिसोड आहे त्यावर मी योग्यवेळी पुस्तक लिहिणार आहे. त्यातून नेमकं काय घडलं हे तुमच्या लक्षात येईल अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं. आता, या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या दुसऱ्या भागात २०१५ पासून ते २०२३ पर्यंतच्या अनुभवी आणि प्रसंगारुप घटनांची माहिती शरद पवार यांनी लिहिली आहे. त्यातच, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन केलेल्या शपथविधीवरही पवार यांनी खुलासा केलाय. 'अजित पवारांनी उचललेलं पाऊल अत्यंत गैर होत. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेलं, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी या पुस्तकात केला आहे.