"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 05:23 PM2020-06-23T17:23:23+5:302020-06-23T17:27:32+5:30
"माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी त्यांची भेट घेतली."
मुंबई : मराठी माणसासाठी आग्रह आणि हिंदुत्व या दोन गोष्टीत राज ठाकरेंसोबत आमचे पटू शकते. मात्र, परप्रांतियांबाबत ते जी भूमिका घेत आले आहेत, त्यामध्ये आमचे आणि त्यांचे जमणे कठीण आहे, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
'द इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले.
राज ठाकरे आणि भाजपा भविष्यात एकत्र येतील का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, "राज ठाकरेंसोबत आमचे दोन गोष्टीत पटू शकते. एक म्हणजे मराठी माणसाचा त्यांचा आग्रह मला मान्य आहे. दुसरे हिंदुत्व शंभर टक्के मान्य आहे. फक्त एक गोष्ट आम्हाला मान्य होऊ शकणार नाही, ते म्हणजे परप्रांतियांसंबंधात, गैर मराठी लोकांविषयी घेण्यात येणारी टोकाची भूमिका नको आहे. आता त्यांची भूमिका फार टोकाची वाटत नाही."
याचबरोबर, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. मराठी माणूस हा महत्त्वाचा आहेच, महाराष्ट्रात त्याला महत्त्व मिळालेच पाहिजे, पण गैरमराठींचा तिरस्कार नको. याबाबत आमची मतं जुळत नाहीत, तोपर्यंत राजकीय प्रेमप्रकरण होणे कठीण आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात')
शिवसेना मोठी कधी झाली? शिवसेनेने मराठी माणसासोबत हिंदुत्वाची कास धरली, तेव्हा राष्ट्रीय पक्ष झाला. त्यानंतर राज ठाकरेंच्याही लक्षात आले की मराठी माणूस हा केंद्रबिंदू असलाच पाहिजे, पण त्याला व्यापकता दिली नाही तर, आपली भूमिका मर्यादित राहते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्याकडे एक वेगळा विचार आहे, त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक पद्धत आहे. माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून समजून घेतले की नेमके त्यांच्या मनात काय आहे, त्यांचा ट्रॅक करेक्ट होता, ते योग्य दिशेने होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.