मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 05:50 PM2023-01-13T17:50:36+5:302023-01-13T17:51:02+5:30

त्याला काही अर्थ नाही असं सांगत फडणवीसांनी ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला आहे. 

Devendra Fadnavis Target Uddhav Thackeray over Pankaja munde offer | मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

googlenewsNext

मुंबई - भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार पुढे येत असतात. अलीकडेच एका मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी राजकारणातून एक्झिट घेण्याबाबतही विधान केले होते. त्यानंतर आता ठाकरे गटातील नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना त्यांच्या पक्षात येण्यासाठी ऑफर देत आहेत. पंकजा मुंडे यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय असंही ठाकरे गटाचे नेते खैरे यांनी म्हटलं. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मातोश्रीचे दार पंकजा मुंडे यांच्यासाठी उघडे असले तरी त्या दारातून कधी जाणार नाही. पंकजाताई भाजपातच राहणार आहे. भाजपा हे त्यांचे घर आहे. त्यामुळे मनातील मांडे मनातच राहतील. कितीही विधानं केली तरी ते राजकीय आहेत. त्याला काही अर्थ नाही असं सांगत त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय सुरू आहे. त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणे झाले आहे. मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. त्या कधीही येऊ शकतात. आगामी काळात काहीतरी घडू शकतं असं भाकीत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. तर पंकजा मुंडे या राज्यातील महत्त्वाच्या नेत्या आहेत. त्यांच्यावर भाजपामध्ये अन्याय होतोय. आपण सर्वच ते पाहत आहोत. अर्थात ही त्यांची पक्षांतर्गत बाब आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांच्या कर्तृत्वाची नेहमीच आम्हाला कदर असेल. पण त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि त्यांना जर शिवसेनेत यायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करू असे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी म्हटले आहे.

विखे पाटलांनीही फटकारलं
पंकजाताई या मोठ्या नेत्या आहेत, त्यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरेंचे विधान पाहता मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीसी वाटते. खैरेंनी अशी बेताल वक्तव्य करणे बंद केले पाहिजे. पंकजाताईंची भूमिका पक्षाच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. ताई या पक्षाचे नेतृत्व करत आहेत आणि यापुढेही करत राहणार, असे मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.   
 

Web Title: Devendra Fadnavis Target Uddhav Thackeray over Pankaja munde offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.