काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 06:15 PM2023-06-21T18:15:27+5:302023-06-21T19:03:59+5:30
कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या असं फडणवीस म्हणाले.
मुंबई - ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली. ईडीच्या छापेमारीनंतर राज्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. कोविड काळातील घोटाळ्याच्या आरोपावरून ईडीने ही छापेमारी केली, नेमका कोविड जम्बो सेंटर घोटाळा आहे काय याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या. लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले. पुण्यात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला. कोविड काळात अनेक खोट्या कंपन्या उभारण्यात आल्या. त्यात अनुभव नसलेल्यांना कंत्राट देण्यात आली. त्याबाबत चौकशी सुरू होती. आता ही चौकशी कुठपर्यंत पोहचली, छाप्यात काय सापडले हे ईडीच सांगू शकते मला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं.
काय आहे घोटाळा?
कोरोनाकाळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी कंत्राटे काढण्यात आली. राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि भागीदारांची एक कंपनी होती. डॉ. हेमंत गुप्ता, संजय शाह, राजू साळुंखेही भागीदार आहेत. लाईफलाईन मॅनेजमेंट सर्व्हिसला कुठलाही अनुभव नसताना कंत्राटे देण्यात आली. हे कंत्राट वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे होते. यात कंपनीने बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. बीएमसीला सादर केलेले पार्टनरशिप डिडही खोटे असल्याचे बोलले जात आहे. पुरेसा स्टाफ नसल्याने इंटर्न डॉक्टरांनाही नेमल्याचे उघड झाले आहे. एकूण १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
भविष्यात फासे उलटे पडतील - राऊत
ईडीच्या या कारवाईवरून संजय राऊतांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर निशाणा साधला. ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्यात, त्यात ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांच्या घरी धाड टाकलीय, कोविड घोटाळ्याच्या नावाखाली टार्गेट केले जातेय. जे शिंदे गटात गेलेत ते मुख्य लाभार्थी आहेत त्यांना का वगळले? खरोखरच चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा, दुसऱ्या गटात जाऊन कातडी वाचवतायेत त्या सगळ्यांची चौकशी करा. शिवसेनेच्या प्रमुख लोकांवर कारवाई करायची. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आम्ही या कारवाईला हिंमतीने सामोरे जायला तयार आहोत. अनिल परब, रवींद्र वायकर, मी स्वत: आम्ही सामोरे गेलोत, भविष्यात सत्ता बदलली तर फासे उलटे पडू शकतात असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिला.