देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस...; मराठा आरक्षणावर राम कदमांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 01:42 PM2024-07-18T13:42:19+5:302024-07-18T13:43:02+5:30
Ram Kadam on Maratha Reservation: लोकसभेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता पुन्हा या आंदोलनाने धार पकडायला सुरुवात केली असून राज्यातील सरकार डॅमेज कंट्रोलसाठी धडपडू लागले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय वाढला आहे. मनोज जरांगे पाटलांनी लाखो आंदोलकांना घेऊन मुंबई गाठली होती. परंतू त्यांना मुंबईच्या वेशीवरच मुख्यमंत्र्यांनी थांबवून आरक्षण देण्याचे जाहीर करत माघारी पाठविले होते. यानंतर लोकसभेला या आरक्षणाच्या मुद्द्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला होता. आता पुन्हा या आंदोलनाने धार पकडायला सुरुवात केली असून राज्यातील सरकार डॅमेज कंट्रोलसाठी धडपडू लागले आहे. भाजपाचे नेते राम कदम यांनी आरक्षणावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मराठा समाजाची 50 वर्षांपासून आरक्षणाची मागणी आहे. या दरम्यान अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. शरद पवार तीनदा मुख्यमंत्री झाले. यांच्यापैकी एकालाही कधी मराठा समाजाची आठवण झाली नाही. पहिल्यांदा आरक्षण देण्याचा आणि मराठा समाजा दिलेला आरक्षण कोर्टात टिकवण्याचे काम जन्माने ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केले. काय अपराध आहे त्यांचा? अपराध जर कोणाचा असेल तर तो उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यांच्या कर्तव्य शून्यतेमुळे कोर्टात टिकवता आले नाही, असा आरोप राम कदम यांनी केला.
अपराध जर कोणाचा असेल तर शरद पवार यांचा देखील आहे. त्यांनी मुख्यमंत्री असून त्यांना मराठा समाज का? आठवला नाही. अपराध जर कोणाचा असेल तर त्या काँग्रेसमधील दुटप्पी नेत्यांचा आहे. आता नुकतेच अधिवेशन झाले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक बोलावली होती. याबैठकीला काँग्रेसवाले का आले नाहीत, उबाठा देखील का आले नाहीत. कोणी अडवले होते या नेत्यांना असा सवाल राम कदम यांनी केला.
या तीनही पक्षाची भूमिका ही आजही समाजामध्ये भांडण लावण्याची आहे. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रासाठी देव माणूस म्हणून पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देखील झोकून देऊन काम करत आहेत. ही गोष्ट नाकारता येणार नाही. सरकारची भूमिका आरक्षणाविषयी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. पण या तिघांची भूमिका काय हा सवाल आपण त्यांना कधी विचारणार आहोत, असा सवालही कदम यांनी केला.