Devendra Fadnavis : 'मला अटक करण्याचा आदेश वरुन आला होता'; देवेंद्र फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:12 PM2023-01-24T19:12:01+5:302023-01-24T19:30:22+5:30
Devendra Fadnavis : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
Maharashtra Politics: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट आखला होता, हे काम तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले गेले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर आता पुन्हा फडणवीसांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले होते की, 'महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असे टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते.' यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी यांनी हे आरोप फेटाळून लावले.
आता काय म्हणाले फडणवीस?
दिल्ली दौऱ्यावर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वळसे पाटील यांच्या वक्तव्याबाबत सांगण्यात आले. त्यावर फडणवीस म्हणाले की, मी अतिशय सत्य सांगितेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात माझ्यावर गुन्हा दाखल करुन मला कारागृहात टाकण्याचा प्रयत्न होता. याची सुपारी तत्कालिक मुंबईचे पोलिस कमिशन संजय पांडे यांना दिली होती. याची माहिती एकनाथ शिंदे यांनादेखील आहे.'
यावेळी त्यांना तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावल्याचे सांगण्यात आले. त्यावर फडणवीस म्हणाले, मी दिलीप वळसे पाटलांवर कुठलाही आरोप केला नाहीये. हा जो आदेश आला होता, तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरुन आलेला होता, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.