"त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना, त्यांच्यामुळेच हे सरकार येऊ शकलं"; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सणसणीत टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 07:21 PM2022-07-23T19:21:17+5:302022-07-23T19:21:46+5:30
"नऊ वाजता बोलणारे आता जरा कमी झालेत"
Devendra Fadnavis Trolls Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातीला राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. संजय राऊत गेली अडीच वर्षे सातत्याने भाजपावर आणि आता शिंदे गटावर टीका करत आहेत. या मुद्द्यावरून आज देवेंद्र फडणवीसांनीसंजय राऊतांना जोरदार टोला लगावला.
"नऊ वाजता बोलणारे अलिकडच्या काळात कमी बोलायला लागले आहेत. कारण काय ते आम्हाला माहिती नाही पण त्यांचं बोलणं कमी झालं आहे. तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका. उलट त्यांचे आभार माना. कारण हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा कोणाचाच नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला, शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी वैताग आणला. सगळेच त्यांना वैतागले. शेवटी सगळ्यांनी ठरवलं की हा लाऊडस्पीकर बंद करायचा असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना खरं तर आपण धन्यवादच दिले पाहिजेत", अशी सडेतोड बॅटिंग देवेंद्र फडणवीसांनी केली.
भाजपाने शब्द दिला नव्हता, शिवसेनेने गद्दारी केली!
"शिवसेनेने 2019 मध्ये भाजपाशी गद्दारी केली. मी साक्षीदार आहे की आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. पंतप्रधान मोदीजी, अमित शाह, उद्धव ठाकरे सारेच सांगत होते की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. निवडणूक निकालाच्या आधीच, आमचे मार्ग खुले, असं ते सांगू लागले. मी फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. कारण त्यांचं आधीच ठरलं होतं", असा थेट आरोप फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला.
आता जनता खुला श्वास घेतेय!
" महाविकास आघाडीच्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांवर केसेस केल्या. पण कोणी घाबरलं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्ष फक्त सूड उगवण्याचे काम केले. आमच्या विरोधात बोललात तर घर तोडू, खूप ठिकाणी पोलिस स्थानकात फिरवू, असा त्यांचा कार्यक्रम होता. अन्याय, अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली. पण आपण सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेर आता खुला श्वास घेत बैठक होतेय आणि महाराष्ट्राची जनता खुला श्वास घेतेय", असेही फडणवीसांनी स्पष्ट केला.