फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 07:05 AM2024-10-22T07:05:51+5:302024-10-22T07:06:24+5:30
खोट्या बातम्या पसरविण्याची सुपारी; संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धवसेना यांच्यात जागावाटपावरून ताणाताणी सुरू असताना सोमवारी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कथित गुप्त भेट घेतल्याच्या चर्चेने एकच गदारोळ निर्माण झाला. एका वृत्तवाहिनीने या भेटीची बातमी दिली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे अचानक यू-टर्न घेणार का, अशा चर्चा रंगू लागल्या. विशेष म्हणजे काँग्रेसमधील सूत्रांचा हवाला या बातम्यांत देण्यात आला होता. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उद्धवसेनेचे खा. संजय राऊत या तिघांनीही या बातम्या पूर्णपणे निराधार आणि खोट्या असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.
महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी देखील जागावाटपात आक्रमक भूमिका घेतली आहे. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातही वाजले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या.
भाजप जाणीवपूर्वक गैरसमज पसरवतेय
उद्धवसेना आघाडीतून बाहेर पडणार, या बातम्यांत काहीही तथ्य नाही. भाजप जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवत आहे. पराभवाच्या भीतीने अशी खेळी करीत आहेत.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
एक टक्काही तथ्य नाही
या बातमीत एक टक्काही तथ्य नाही. काँग्रेस आणि उद्धवसेनेत वाद निर्माण व्हावा हे काही लोकांचे षडयंत्र आहे. त्यामुळे ही बातमी मुद्दाम पेरली गेली आहे. महाविकास आघाडी ही एकसंधच राहील.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
खोट्या बातम्या पसरविण्याची सुपारी
खोट्या बातम्या पसरविण्याची सुपारी कोणी दिली, याची माहिती आमच्याकडे आहे. असे कोणी दावे करणार असेल तर त्यांनी आधी बाप दाखवावा, नाहीतर श्राद्ध करावे.
- खा. संजय राऊत, नेते, उद्धवसेना