देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:54 AM2023-03-24T05:54:25+5:302023-03-24T07:16:06+5:30
दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन बड्या नेत्यांमधून विस्तव जात नाही, असे चित्र गेले कित्येक महिने असताना आज अचानक दोघांच्या भेटीचा योग जुळून आला. दोघांनी हितगुजही साधले. त्यातच विधान परिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा झाड (युतीचे) वाढविण्याचा विचार शांततेत करा, या शब्दात उद्धव यांना साद घातली. त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नसली तरी दोन्ही प्रसंगांनी कटूतेचे गडद रंग फिके झाल्याचे जाणवले.
विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे सकाळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. त्यांचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव. दोघांनी स्मित हास्य केले. नमस्कार झाला आणि बोलले देखील.
‘बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी’
आठ महिन्यांपासून दोघांमध्ये साधी भेटही होऊ शकली नव्हती. पण, आजच्या भेटीत सहजता होती; कटूतेचा लवलेशही नव्हता. दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. पूर्वी खुलेपणा होता. पण, हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते, असे म्हटले.
परिषदेत झाड, खत, फळे आणि हास्यकल्लोळ
विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत उद्धव ठाकरे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील टोले - प्रतिटोल्यांनी खसखस पिकविली. ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या उद्घाटनाला शरद पवार आले होते. आपणही होते. पवार साहेबांनी झाड लावले, असे मुनगंटीवार म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरेंनी ‘पण त्या झाडाला फळेच लागली नाहीत’ असा टोला लगावला. त्यावर मुनगंटीवार म्हणाले - ‘उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो, की झाडाला फळे येतील. पण, तुम्ही झाडाशीच नाते तोडले. आता त्याला काय करणार? मी व्यक्तिगत येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणते खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरेच खत दिले. त्या झाडाला फळे कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती’. यावर ठाकरे यांनी “त्या पाकिटात खत नव्हते, निरमा होते” असा टोला लगावला. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, खतच होते. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं ते झाड जाळणारे होते, ते टाकले. अजूनही काही बिघडलेले नाही. उद्धवजी, ‘पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा’, असे आवाहन मुनगंटीवार यांनी करताच पुन्हा हंशा पिकला.