Devendra Fadanvis: फडणवीसांचा सरकारवर व्हिडीओ बॉम्ब; १२५ तासांचे स्टिंग ऑपरेशन केले विधानसभेत सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 06:44 AM2022-03-09T06:44:56+5:302022-03-09T06:48:11+5:30

महाविकास आघाडीचा विरोधकांना संपवण्याचा कत्तलखाना; विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांच्या सहकार्याने षड् यंत्र रचल्याचा आरोप

Devendra Fadnavis video bomb on uddhav Thackeray government; 125 hours sting operation was presented in the assembly against opposition leaders | Devendra Fadanvis: फडणवीसांचा सरकारवर व्हिडीओ बॉम्ब; १२५ तासांचे स्टिंग ऑपरेशन केले विधानसभेत सादर

Devendra Fadanvis: फडणवीसांचा सरकारवर व्हिडीओ बॉम्ब; १२५ तासांचे स्टिंग ऑपरेशन केले विधानसभेत सादर

Next

कमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधकांविरुद्ध कत्तलखाना चालवत असल्याचा सनसनाटी आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. आपल्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ तब्बल सव्वाशे तासांचे केलेले स्टिंग ऑपरेशन २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हमध्ये भरुन त्यांनी सादर केले. फडणवीस बोलत होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य चिडीचूप होते. सरकारमधील नेत्यांच्या इशाऱ्यावरुन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांच्या सहकार्याने भाजपच्या किमान डझनभर नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले.

महाविकास आघाडीचे नेते या सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांवर सूड उगविण्याचे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदार, पुरावे सारे मॅनेज केले जात आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला. गेले काही दिवस केंद्र सरकार राज्यातील नेत्यांविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत होते. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे आरोप केले.

२९ वेगवेगळ्या पेनड्राईव्ह
n त्यांनी सव्वाशे तासांच्या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून सादर केला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात कुंभाड रचून एकूण २८ लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. 
n शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. 
n या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. 
n ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. 
n प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

मलिक यांचा राजीनामा घ्या
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल व शहावली खान यांच्याशी संबंध असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. सरकारने त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.

‘त्या’ पेनड्राईव्हमध्ये काय?
त्यासाठीच संजय पांडे आयुक्तपदी...
साहेबांना फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांना कसे संपवायचे आहे, त्यासाठी कोणते निर्देश प्राप्त झाले, हे सर्व करण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांना कसे बसविण्यात आले. तशी कबुली दिली. 

पुरावे प्लांट करतान रेकी 
मीडियाला कोणत्या बातम्या लीक करायच्या, आधीच ठेवलेल्या पुराव्यांचे चित्रीकरण कसे करायला लावायचे, याचेही तपशील त्यात आहेत. पुरावे प्लांट करताना कुठेही कॅमेरे नाहीत, यासाठी आधीच रेकी कशी करण्यात आली, याचीही कबुली ते देत आहेत. 

स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून...
अनिल गोटे यांचा या वकिलांशी प्रत्यक्ष संवाद आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील बैठकांचे तपशील आहेत. साहेब कसे कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत आणि उगाच पोलीस स्टेशन डायरीत नोंद नको, म्हणून पडद्याआडून काय-काय निर्देश देतात, याची संपूर्ण कथा फडणवीस यांनी अत्यंत नाट्यपूर्णरित्या सांगितली.

भाजपचे पाटील, महाजन, मुनगंटीवार टार्गेटवर 
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर आहेत आणि त्यांना कसे-कसे संपविण्यात येणार आहे, त्यातून कुणाचे काय लाभ होणार आहेत, याचेही तपशील यात आहेत. 

अनिल देशमुखांनी कमाविले पैसे 
अनिल देशमुख यांनी केवळ बदल्यांमध्ये नाही, तर इतरही स्त्रोतांतून कसे पैसे कमाविले, छगन भुजबळ यांना पैसे घेऊन कसे सोडण्यात आले, याचे तपशील यात आहेत.

राऊतांच्या भेटीत गुन्हा दाखल करण्याचे प्लॅन
संजय राऊत यांची भेट घेऊन काय नियोजन करायचे, पुढच्या काळात कोणत्या ठिकाणी, कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार, नवाब मलिक यांनी काय जबानी द्यायची, त्यातून फडणवीस यांना कसे फसविता येईल, रश्मी शुक्ला प्रकरणात काय सल्ला द्यायचा, राजकीय नेत्यांनी त्यांना दिलेली मोकळीक अशी सर्व माहिती आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

प्रवीण चव्हाण काेण?
माजी मंत्री सुरेशदादा जैन, डीएसके, बीएचआर बँक या प्रकरणांमध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण हेच होते, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

कोणाची घेतली नावे?
n या कटात सरकारमधील मंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पूर्वाश्रमीचे भाजपचे व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले नेते, माजी आमदार अनिल गोटे आदी सहभागी असल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट होत असल्याचे फडणवीस म्हणाले.
n मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे निवृत्तीपूर्वी हे प्रकरण तडीस नेतील, असा दावाही स्टिंग ऑपरेशनमध्ये आहे. प्रकरण पुण्यात, गुन्हा मुक्ताईनगरमध्ये कसा दाखल केला, असा सवाल त्यांनी केला. 
n स्टिंगमध्ये चव्हाण सतत ‘साहेबांच्या इशाऱ्या’वरून हे सुरू असल्याचे सांगत असल्याचा उल्लेख फडणवीस करीत होते. त्यामुळे भाजपचे सदस्य हे ‘साहेब कोण?’ असा सवाल करीत होते. अजित पवार व दिलीप वळसे-पाटील हे आपले ऐकत नाहीत; पण, अनिल देशमुख असते तर कारवाई झाली असती, असा दावा हा वकील करीत असल्याचे फडणवीस यांनी निदर्शनास आणले. देशमुख यांनी दोन वर्षांत अडीचशे कोटी रुपये कमावल्याचा दावाही स्टिंग ऑपरेशनमध्ये केल्याचे फडणवीस यांनी लक्षात आणून दिले.

Web Title: Devendra Fadnavis video bomb on uddhav Thackeray government; 125 hours sting operation was presented in the assembly against opposition leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.