Devendra Fadnavis v/s Sanjay Raut Interview : बाळासाहेबांच्या पक्षाला युतीखेरीज पर्याय नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 06:44 AM2018-04-11T06:44:05+5:302018-04-11T06:44:05+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणाऱ्या पक्षाला २0१९ मध्ये भाजपासोबत युती करण्याखेरीज पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणाऱ्या पक्षाला २0१९ मध्ये भाजपासोबत युती करण्याखेरीज पर्याय नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार खा. संजय राऊत यांनी घेतली. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर ‘रोखठोक’ प्रश्नांची सरबत्ती केली, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांचा समर्पक ‘सामना’ केला. मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच वाटचाल करीत आहेत. ज्या वेळी देशातील तथाकथित सेक्युलर एकत्र येतात, त्या वेळी देशातील सर्वधर्मसमभाव मानणारे हिंदुत्ववादी यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली असती. त्यामुळे त्यांच्या विचारांनी चालणा-या पक्षाला २0१९ मध्ये युती करणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मात्र, युती झाली, तर आपण भाजपा सोडू, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली असून, तुम्ही त्यांना वाजतगाजत पक्षात घेतले असल्याकडे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस म्हणाले की, याबाबत शिवसेनेनेच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शिवसेना आमच्याशी सवतीप्रमाणे वागल्याने आम्हाला राणे यांना पक्षात घ्यावे लागले. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात राऊत मुख्यमंत्र्यांच्या घेणार असलेल्या मुलाखतीबाबत कमालीची उत्सुकता आणि कुतूहल होते. सुरुवात करू का, लोक आपल्यासाठी थांबलेत, असा प्रश्न राऊत यांनी करताच, हा ‘सामना’ नाही हे लोकांना सांगा, असे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. दोघांकडूनही मॅच फिक्सिंग झालेली नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. देशात पेपर फुटीचे लोण पसरले असले, तरी इथला पेपर फुटलेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मी मुलाखत घेणार म्हटल्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती, असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, अलीकडेच पवार यांची मुलाखत राज ठाकरे यांनी घेतली. त्या पार्श्वभूमिवर ही मुलाखत द्यावी की न द्यावी, असा विचार मनात आला होता. तुम्ही शिवसेनेचे मुखपत्र सामना वाचत नाही, असा तिरकस सवाल राऊत यांनी केला. त्यावर फडणवीस म्हणाले, सामना दिल्लीतील पत्रकार वाचतात. त्यांची बातमीची भूक सामना भागवते. त्या बातमीवर मला पत्रकार प्रतिक्रीया विचारतात. मात्र त्यावेळी मी त्यांना सामना वाचलेला नाही, असे सांगतो. मी जे बोलतो, ते तुम्ही संगळं खरं मानू नका, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पोलादी शिस्त आहे. तेथे उद्या काय घडेल, हे तुम्ही सांगू शकाल का, असा प्रश्न राऊत यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, संघाचे निर्णय संघ घेतो. हे असे एकमेव संघटन आहे जे वर्षभराचे निर्णय एकदम घेते आणि वर्षभर त्यावर काम करते. त्यांच्या निर्णयाची मला माहिती नाही आणि माझा त्या निर्णयात सहभाग नसतो. हाच धागा पकडून राऊत यांनी मग शिवसेनेत युतीबाबत काय घडणार, हे तुम्ही कसे सांगू शकता, असा प्रश्न केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. राजकीय पक्षाच्या बोलायच्या आणि करायच्या गोष्टी वेगळ्या असतात. राजकीय पक्षाला अपरिहार्यता असते. मात्र संघ राजकीय पक्ष नसल्याने त्यांना अशी अपरिहार्यता नाही.
> जागांच्या संख्येवरून रंगली प्रश्नोत्तरांची जुगलबंदी
। खा. राऊत : २0१४ मध्ये शिवसेना बाळासाहेबांचीच विचारधारा मानत असतानाही भाजपने युती तोडली.
। मुख्यमंत्री : त्यावेळी शिवसेनेला १५१ जागा हव्या होत्या. आम्ही सेनेला १४७ जागा घेण्यास सांगत होतो. भाजप १२७ जागा लढवून मित्र पक्षांना १९ जागा देणार होती. मात्र शिवसेना १५१ पेक्षा अधिक जागांवर अडून राहिल्याने युती तुटली. अन्यथा शिवसेनेचे १२0 आमदार आणि भाजपचे १0५ आमदार निवडून आले
असते आणि कदाचित उद्धव ठाकरे किंवा राऊत तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. तथाकथित सेक्युलरवादी त्यावेळी वेगळे लढले. तेव्हा आकड्याचा घोळ घातला नसता, तर वेगळे चित्र दिसले असते.
।। खा. राऊत : आता आकड्याचा घोळ सुटणार आहे का आणि आता कुठला आकडा ठरला आहे.
।। मुख्यमंत्री : तुमच्या मनातील आकडा मला ठाऊक आहे.
।। खा. राऊत : मटका बंद आहे का?
।। मुख्यमंत्री : मीच गृहमंत्री असून, मीच राज्यातला मटका बंद केला आहे.
>भारतीय रेल्वे होईल जगात सर्वोत्तम - पीयूष गोयल
भारतीय रेल्वेच्या कार्यप्रणालीत मोठे बदल होताहेत. खराब रेल्वेमार्ग बदलण्याच्या कामांची गती तिपटीने वाढली आहे. अनेक कामांमुळे येत्या काळात भारतीय रेल्वे सर्वाधिक सुरक्षित, विश्वासार्ह व सर्वोत्तम होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार दीबांग यांनी गोयल यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये गोयल यांनी भारतीय रेल्वेच्या विविध योजना मांडल्या. मार्च २०१९ नंतर रेल्वे काटेकोरपणे वेळापत्रकानुसार धावेल. तशी कामे सध्या सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.