देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 13:34 IST2023-05-12T13:34:32+5:302023-05-12T13:34:58+5:30
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावरून आता राज्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परबांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद ...

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल'
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावरून आता राज्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परबांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल कशी निकालाची अर्धवट माहिती दिली ते सांगितले. तसेच नैतिकतेचा मुद्दा धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी केली. यावर फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे १६ आमदारांच्या अपात्रतेचे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. अशा प्रकारे जर स्पिकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते फ्री आणि फेअर अश्याप्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पिकर कोणत्याही दबावाला बळी पडतील. जे कायद्यामध्ये आहे. जे संविधानामध्ये आहे. जे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निर्णय करतील योग्य सुनावणी करत योग्य तोच निर्णय देतील अशी अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.
उध्दव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार नाहीय. कारण जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आले, ज्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचार, युती, आणि पक्ष ही सोडला, ते कोणत्या अधिकाराने नैतिकता सांगतात असा सवाल करत फडणवीसांनी शरद पवारांवरही शरसंधान साधले.
शरद पवार यांचा नैतिकतेच्या संबंध आहे का? जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल. वसंत पाटील यांचे सरकार कसे गेली इथं पासून सुरू करावे लागेल, ते जेष्ठ नेते आहेत, समजून घ्यावे, असा इशार फडणवीस यांनी दिला आहे.