विधानसभेतून बाहेर पडल्यावर फडणवीसांनी कुठे वळवला मोर्चा?; काँग्रेसनं सांगितली 'आतली' चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 09:01 AM2019-12-01T09:01:34+5:302019-12-01T09:01:57+5:30
विश्वासदर्शक ठरावावेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून फडणवीस नेमके गेले कुठे?; काँग्रेस म्हणते...
मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. विधानसभेचं अधिवेशन नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं बोलवण्यात आल्याचा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. सरकारनं नव्या हंगामी अध्यक्षांची पायमल्ली केल्याचा आरोप करत संविधानाची पायमल्ली झाल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अनेक तांत्रिक बाबी सांगत फडणवीस यांचे आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर फडणवीस यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला.
भाजपा आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन विरोधकांना लक्ष्य केलं. 'अशी एक चर्चा आहे की, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं स्वागत करायला देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांना जायचे होतं. म्हणूनच भाजपनं सभागृहातून पळ काढला', असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं. काल विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला जाण्यापूर्वीच भाजपा आमदार सभागृहातून बाहेर पडले.
अशी एक चर्चा आहे की, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत करायला देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांना जायचे होते म्हणूनच #भाजप ने सभागृहातून पळ काढला.
— Sachin Sawant (@sachin_inc) November 30, 2019
Greeted our @BJP4India National President & Hon HM @AmitShah ji at Mumbai Airport.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2019
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले, तेव्हा मन:पूर्वक स्वागत केले. pic.twitter.com/7QHLB2UZWk
भाजपाचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडताच पत्रकारांशी संवाद साधला. सव्वा तीनच्या सुमारास त्यांनी सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बातचीत केली. 'सरकारनं नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीनं विधानसभेचं अधिवेशन बोलावलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारनं केली. २७ नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झालं, ते ‘वंदे मातरम्‘ने सुरू झालं आणि राष्ट्रगीतानं सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थागित झालं होतं. नव्यानं अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांकडून समन्स असावा लागतो. मध्यरात्री १ वाजता हे कळवण्यात येतं. यामागे नेमका उद्देश काय?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर ५ वाजता फडणवीस यांनी एक ट्विट केलं. त्यात ते भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करताना दिसत आहेत.