'देवेंद्र फडणवीसच पुन्हा होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 02:26 AM2019-06-21T02:26:57+5:302019-06-21T02:27:26+5:30

खासदार गोपाळ शेट्टी यांना विश्वास; ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचाराचे कौतुक

Devendra Fadnavis will again be the Chief Minister of Maharashtra! | 'देवेंद्र फडणवीसच पुन्हा होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!'

'देवेंद्र फडणवीसच पुन्हा होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!'

Next

नवी दिल्ली : ‘देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदापासून मुख्यमंत्रीपदा पर्यंतचा प्रवास केला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकासच झाला आहे. ज्याप्रमाणे देशात नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आहे, तसाच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील,’ असा विश्वास खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’च्या ‘खासदार कट्टा’ या कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी त्यांनी परप्रांतियांची गर्दी, लोकसभेतील यश, मतदारसंघातील नवी आव्हाने आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

प्रश्न : मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह नाही का?
उत्तर : उद्धव ठाकरे यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी आग्रह धरल्याचे मला तरी आठवत नाही. दोन्ही पक्ष राष्ट्रहितासाठी एकत्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सक्षम असल्याचे त्यांनाही मान्य आहे. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या नावाची ना चर्चा आहे ना शक्यता आहे. त्यांनी विकासपुरुष म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे विधीमंडळातील नेते देवेंद्र फडणवीसच असतील.

प्रश्न : मुंबईला परप्रांतियांची गर्दी त्रासदायक वाटते का?
उत्तर : ज्या शहरांमध्ये रोजगार उपलब्ध असतो, त्याठिकाणी परप्रांतियांची गर्दी होत असते. हे चित्र केवळ मुंबईत नाही, तर संपूर्ण देशात बघायला मिळते. मुंबईत टेलिफोन आले तेव्हा मजुरीची आणि कौशल्याची कामे करायला आपल्याकडे लोक नव्हते. ते सारे उत्तर भारतातून आले. नाल्यांमध्ये उतरून घाण साफ करण्याची तयारी उत्तर भारतीयांची होती. पुढे रस्त्यांची, बांधकामाची कामे करण्यासाठी ठेकेदारांनी उत्तर भारतातून मजूर आणले. काम आटोपल्यावर मजुरांनी परत जाणे अपेक्षित होते, पण त्यांना मुंबईतच दुसरे काम मिळाल्यावर ते स्थायिक झाले. रेल्वे रुळाच्या बाजुला वस्त्या उभ्या झाल्या. गिरणीत काम करणाºया दक्षिणेतील लोकांनी मिसळ पावचा व्यवसाय सुरू केला. त्याच लोकांचे आता पंचातारांकित हॉटेल्स झाले.

प्रश्न : लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांचे आव्हान मोठे होते का?
उत्तर : मुळीच नाही. संजय निरुपम यांना उत्तर मुंबईतून पळ काढायचा असल्याने त्यांनी उर्मिलाला उमेदवारी दिली. मुळात काँग्रेसच्या पडत्या काळात त्या पक्षात आल्या. शिवाय काँग्रेसचे नेतेही त्यांच्यासोबत नव्हते. मात्र, त्यांची भाषणाची आणि जनसंपर्काची शैली मला आवडली. अवघ्या पंधरा दिवसांमध्ये त्यांनी प्रभावी प्रचार केला. त्यामुळे त्यांना मिळालेल्या मतांमध्ये काँग्रेसचे काहीच श्रेय
नाही. त्यांनी स्वत:च्या भरवश्यावर एवढी मते मिळवली आहेत आणि ते कौतुकास्पद आहे. मी प्रचारादरम्यान कधीही त्यांच्यावर टीका केली नाही. प्रत्यक्ष भेटीतही मी त्यांचे कौतुकच केले.

प्रश्न : लोकसभेत खासदारकीची शपथ मराठीत का घेतली नाही?
उत्तर : माझे मराठीवरील प्रेम मुंबईतील लोकांना सांगण्याची गरज नाही. मी मराठीत किंवा संस्कृतमध्ये शपथ घेऊ शकलो असतो. विश्व हिंदू परिषदेच्या आग्रहात्सव मी संस्कृतची तयारीही केली होती. मात्र, मी मुळ दाक्षिणात्य आहे आणि दक्षिणेत हिंदीचा विरोध होतो. त्यापार्श्वभूमीवर हिंदीत शपथ घेऊन राष्ट्रभाषेप्रती आदराचा संदेश मला द्यायचा होता. मी हिंदीतून शपथ घेतली नसती तर भाजपच्या एकाही नेत्याला राष्ट्रभाषेबद्दल अभिमान नाही, अशी चर्चा झाली असती.

Web Title: Devendra Fadnavis will again be the Chief Minister of Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.