'वंचित'च होईल विरोधीपक्ष, हे सांगणाऱ्या फडणवीसांवर विरोधात बसण्याची वेळ ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 04:21 PM2019-11-20T16:21:17+5:302019-11-20T16:25:35+5:30
पवारांनी एका भाषणात फिरवलेल्या हवेमुळे वंचितला खातही फोडता आलं नाही. तर भाजप 123 वरून 104 वर आला. वंचितच्या दारुण पराभवामुळे मुख्यमंत्र्यांचा वंचितविषयी केलेला दावा फोल ठरला. उलट फडणवीसांवरच विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे.
मुंबई - लोकसभेप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूक देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार विरुद्ध भाजप अशीच लढवली गेली. राज्यातील भाजप नेत्यांनी सातत्याने शरद पवार यांना लक्ष्य केले. राष्ट्रावादीचे अनेक दिग्गज नेते फोडून पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला. परंतु, शरद पवारांनी सगळ्यांना धूर चारत, अनेकांना अडचणीत आणले. पवारांनी एक्झिट पोलसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दावे आपल्या कृतीतून परतावून लागले. उलट फडणवीसांवरच विरोधात बसण्याची वेळ आणली आहे.
समोर मल्लच नाही, लढायचं कोणाशी, पवारांच्या राजकारणाचा अस्त झालाय, ईडीची चौकशी आणि मी पुन्हा येईल असे मुद्दे घेत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक गाजून टाकली. महाजनादेश यात्रा त्यांनी अशा अविर्भावात काढली की, राज्यात केवळ भाजपच विजयी होणार. मात्र पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत भाजपला सळो की पळो करून सोडले होते.
राज्यात आपल्यासमोर लढण्यासाठी विरोधकच नसून भविष्यातील विरोधीपक्ष वंचित असेल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे वंचितचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. किंबहुना वंचितने आपला मित्रपक्ष असलेल्या एमआयएमला देखील बाजुला केला. परंतु, पवारांनी एका भाषणात फिरवलेल्या हवेमुळे वंचितला खातही फोडता आलं नाही. तर भाजप 123 वरून 104 वर आला. वंचितच्या दारुण पराभवामुळे मुख्यमंत्र्यांचा वंचितविषयी केलेला दावा फोल ठरला. उलट फडणवीसांवरच विरोधीपक्षात बसण्याची वेळ आली आहे.