Devendra Fadnavis मुहूर्त ठरला; देवेंद्र फडणवीस आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:21 PM2022-06-30T15:21:32+5:302022-06-30T15:22:00+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश सरकारला दिले. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर तर उपमुख्यमत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार आहे. दोघांच्याही शपथविधीचा मुहुर्त ठरला असून आज म्हणजेच गुरूवारी संध्याकाळी हा शपथविधी पार पडणार आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सागर बंगल्यावर चर्चा पार पडली.
राज्यात अस्थिर राजकीय वातावरण असताना लवकरात लवकर सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. त्यात काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत अशा परिस्थिती वेळ न दवडता सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने शपथविधी करून घ्यावा असा संदेश दिल्लीहून आला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार समोर येत असल्याची माहिती आहे.
ज्यांना मोठे केले तेच विसरले - उद्धव ठाकरे
सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी आलोच अनपेक्षितपणे. जातो पण तसाच आहे. मी पुन्हा येईन, म्हणालो नव्हतो, असे सांगतानाच उद्धव यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर आगपाखड केली. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तरी मला लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही, असं ते म्हणाले होते.