देवेंद्र फडणवीस स्वत: भावी मंत्र्यांना आज दुपारनंतर फोन करणार; उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:24 IST2024-12-14T06:24:32+5:302024-12-14T06:24:45+5:30
धाकधूक : कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार? भाजपची अंतिम यादी पंतप्रधान माेदींकडे; शिंदेसेना, अजित पवार गटाची यादी तयार

देवेंद्र फडणवीस स्वत: भावी मंत्र्यांना आज दुपारनंतर फोन करणार; उद्या नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे. १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाकारली जाणार याची राजकीय वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा होती. मंत्रिपद ज्यांना दिले जाणार आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारनंतर फोन करणार आहेत. ‘तुम्हाला शपथ घेण्यासाठी यायचे आहे’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जाते.
आधी तारीख ठरली १४ नंतर १५ डिसेंबर
शपथविधी १४ डिसेंबरला मुंबईच्या राजभवनवर करण्याचे आधी ठरले होते. सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्री कार्यालयाने राजभवनला शपथविधीची तयारी करण्याची विनंती करणारे पत्रदेखील दिले होते. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये तयारीही सुरू झाली होती.
शुक्रवारी दुपारी राजभवनला मुख्यमंत्री कार्यालय आणि राजशिष्टाचार विभागाने कळविले, की शपथविधी समारंभ हा नागपूरला होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती केली.
पंतप्रधान मोदींच्या मान्यतेची प्रतीक्षा
n१४ तारखेचा शपथविधी १५ रोजी घेण्याचे का ठरले, याबाबत माहिती घेतली असता समजते, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मंत्र्यांची यादी तयार केली तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंजुरी मोदी यांच्या व्यग्रतेमुळे मिळू शकली नाही. ती शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.
nभाजपच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे घेतले जातील. जुन्या सर्वच मंत्र्यांना संधी मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. फडणवीस यांनी सर्व नावांची शिफारस केली तरी जुन्या चेहऱ्यांबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
बावनकुळेंनी केली
एकनाथ शिंदेंशी चर्चा
nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते शिंदेंना भेटले आणि नंतर पुन्हा फडणवीस यांच्या भेटीला गेले. संभाव्य मंत्री आणि खाती याबाबत या चर्चेत अंतिम रूप देण्यात आल्याची
माहिती आहे.
nशिंदे यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या मंत्र्यांची नावे अंतिम करून ती मुख्यमंत्री फडणवीस यांना कळविली, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील तीन-चार ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप दिले आणि फडणवीस यांना त्याबाबत कळविल्याचीही माहिती आहे.
यापूर्वी नागपूर, पुण्यातही झाला हाेता शपथविधी /पान ८ वर