Devendra Fadnavis vs NCP: "तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 01:53 PM2022-09-17T13:53:40+5:302022-09-17T13:54:20+5:30

उपमुख्यमंत्री फडणवीसांवर राष्ट्रवादीकडून सातत्याने केली जाते टीका

Devendra Fadnavis will resign or not if his promise of Maharashtra Gujarat Industrial race not fulfilled questions NCP Clyde Crasto | Devendra Fadnavis vs NCP: "तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल

Devendra Fadnavis vs NCP: "तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?"; राष्ट्रवादीचा थेट सवाल

Next

Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Deal) गुजरातकडे गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला का मिळाला नाही, यावरून विरोधक राज्य सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. या संबंधी नुकतेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही याबाबत भाष्य करताना एक अतिशय मोठं विधान केले. 'महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षात गुजरातच्या पुढे नेऊन दाखवेन', असे फडणवीस म्हणाले. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांना एक रोखठोक सवाल केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

"राज्यात प्रस्तावित असलेला रिफायनरीचा प्रकल्प आणि वाढवण बंदराचा प्रकल्प आकाराला आला असता तर एव्हाना महाराष्ट्र औद्योगिक विकासात इतर राज्यांपेक्षा १० वर्षे पुढे जाऊन पोहोचला असता. आता आम्ही हे दोन्ही प्रकल्प आणणारच आहोत. त्यामुळे आताच्या घडीला महाराष्ट्र गुंतवणूकदार आणि उद्योजकांना आकर्षित करण्यात गुजरातपेक्षा पिछाडीवर असला तरी येत्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच", असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचा फडणवीसांना खोचक सवाल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की ते महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत गुजरातच्या पुढे नेऊन दाखवणार आहेत. पण ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेतली आहे का? असा खोचक सवाल क्रास्टो यांनी ट्वीट करत केला. तसेच, पुढील दोन वर्षांत केलेले विधान खरे ठरले नाही आणि महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणं शक्य झाले नाही तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?, असा सवालही त्यांनी केला. याशिवाय, 'ज्या गतीने सर्व व्यवसाय गुजरातला पाठवत आहेत, तो पर्यंत हे शक्य होणार नाही', असे भाकितदेखील त्यांनी केले.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरूवारी या प्रकल्पाच्या मुद्द्यावर राज्य सरकारचा निषेध करणारे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार शिंदे व फडणवीस सरकारने परराज्यात नेला असा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. "ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो... पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके... शिंदे - फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी... गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते... स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके... ईडी सरकार हाय हाय...", अशा विविध घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसरात घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Devendra Fadnavis will resign or not if his promise of Maharashtra Gujarat Industrial race not fulfilled questions NCP Clyde Crasto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.