देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:32 PM2024-11-28T14:32:13+5:302024-11-28T14:34:42+5:30
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
Chhagan Bhujbal ( Marathi News ) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी महायुतीत अंतिम चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. "सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या हक्कांवर गदा येऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं आहे. त्यामुळे काही लोक त्यांना प्रचंड टार्गेट करत आहेत. १३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं, ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे," असं म्हणत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
फडणवीस यांचं कौतुक करताना छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होत होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, मी बाहेर राहून सरकारला मदत करेन. पण दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की, तुम्हाला सरकारमध्ये सहभागी व्हावं लागेल. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री व्हावं लागणं ही नाही म्हटलं तरी एक प्रकारची अवहेलना असते. त्यांनी ती सहन केली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी झोकून देऊन काम केलं आणि महायुतीला बहुमत मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली."
दरम्यान, "तीन पक्षांचं सरकार स्थापन होत असताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. अशा चर्चांना महिनाभर लागल्याचंही आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. त्या तुलनेत आताचे तीन-चार दिवस काहीच नाहीत. पुढील चार दिवसांत शपथविधीचा सोहळा पार पडेल," अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे.