मनसेसोबत युतीवर देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य; आगामी राजकारणाचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 06:28 PM2022-04-04T18:28:31+5:302022-04-04T18:29:11+5:30
राज ठाकरेंनी एक भूमिका मांडली. कालपर्यंत त्यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने होती. तेव्हा ती त्यांना फार आवडत होती असा टोला देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे.
मुंबई – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेना-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. या भाषणात राज ठाकरेंनीभाजपावर टीका करणं टाळलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा युती होणार का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आतापर्यंत मनसे युतीबाबत देवेंद्र फडणवीसांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले होते. परंतु पहिल्यांदाच फडणवीस यांनी मनसे युतीवर संकेत दिले आहेत.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात खूप गोष्टी घडत असतात. प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ त्या त्या वेळी निघत असतो. आता या संदर्भात आपण वाट बघितली पाहिजे. आमचे राज ठाकरेंसोबत अनेक वर्षाचे संबंध आहेत. त्यांची भेट घेणे म्हणजे आश्चर्याशी गोष्ट नाही. यापुढेही आम्ही भेट घेऊ त्याचा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच राज ठाकरेंनी एक भूमिका मांडली. कालपर्यंत त्यांची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने होती. तेव्हा ती त्यांना फार आवडत होती. गुदगुळ्या होत होत्या. आता विरोधात भूमिका मांडल्यानंतर ए टीम, बी टीम, सी टीम असा अनेक गोष्टी चालू झालं. शिवसेना कोणती टीम आहे? एक मुख्यमंत्री मिळाल्यानंतर शिवसेनेला काय मिळालं? शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीची झेड टीम, सी टीम, डी टीम म्हणायची अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.
दरम्यान, मनसे-भाजपा युतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले आहे. मनसे-भाजपा युतीवर बोलावं अशी स्थिती नाही. मुंबईत महापालिकेवरील भगवा कितीही कारस्थानं केली तरी खाली उतरणार नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे. कटकारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून आम्ही मुंबई महापालिका जिंकू असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तर राज ठाकरे स्वत:चे विचार मांडत असतात. कुणाचे विचार मांडत नाही. शिवसेना ही राष्ट्रवादीची ढ टीम आहे असा टोला मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.