अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:35 PM2022-09-03T15:35:53+5:302022-09-03T15:36:18+5:30
शाह यांच्या दौऱ्यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटी यांच्यात बैठक होणार आहे
मुंबई - केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असून यात ते मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. भाजपा-मनसे यांच्यात जवळीक वाढली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक भाजपा नेत्यांनी अलीकडच्या काळात शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपा-मनसे युतीचं नवीन समीकरण पाहायला मिळेल का याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तत्पूर्वी अमित शाह मुंबई दौऱ्यावर असल्याने याकडे सगळे लक्ष लावून आहेत.
त्यात अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले की, गणेशोत्सव काळात दरवर्षी अमित शाह मुंबईत येतात. लालबागचा राजा, आशिष शेलारांच्या गणपती दर्शन, मुख्यमंत्री आणि माझ्याकडेही गणेश दर्शनासाठी येतील. काही घरगुती गणपतीचं शाह दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय एका शाळेचे उद्धाटन अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची एक बैठक होईल याशिवाय कुठलाही कार्यक्रम अमित शाह यांच्या दौऱ्यात नाही असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात भेट होणार असल्याचं नाकारलं आहे.
तसेच शाह यांच्या दौऱ्यात मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी आणि भाजपा कोअर कमिटी यांच्यात बैठक होणार आहे. त्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबई ही अमित शाह यांची जन्मभूमी असल्याने विशेष प्रेम या शहरावर आहे. दरवर्षी ते गणेशोत्सवात गणपती दर्शनासाठी येतात. एल अँन्ड टीकडून एका शाळेचं उद्धाटन करण्यात येणार आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
फडणवीसांचा विरोधकांना खोचक सल्ला
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करण्याची फॅशन आहे. कार्याला कार्याने उत्तर देऊ शकत नाही तेव्हा असे होते. मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे. ज्याप्रकारे त्यांनी कामे केली आहेत. त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत. मोदींनी विकासाचा एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी लाईन काढण्याचं काम विरोधकांनी करावं असा खोचक सल्ला फडणवीसांनी विरोधकांना दिला आहे.