वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 06:17 PM2024-11-29T18:17:30+5:302024-11-29T18:18:43+5:30
Devendra Fadnavis : राज्य सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई : राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जारी केला होता. मात्र, राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत, असे म्हणत या निर्णयावर टीका होताच हा निर्णय मागे घेण्यात आला. प्रशासकीय पातळीवर हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. यावर आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने जीआर काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्यासंदर्भात प्रशासनाने GR काढण्याचा प्रकार योग्य नसल्याने मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. राज्यात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी केली जाईल.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2024
राज्य में जब कार्यवाहक सरकार हो, तब वक्फ बोर्ड…
दरम्यान, राज्य सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, याला विरोध होताच हा प्रशासकीय निर्णय असल्याचे सांगत तो लगेच मागे घेण्यात आला. तसेच, वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर ही प्रशासकीय चूक असल्याची माहिती आता समोर आली आहे.