देवेंद्र म्हणती येतो, तात्याबाळे म्हणती पळतो

By Admin | Published: February 26, 2015 02:12 AM2015-02-26T02:12:29+5:302015-02-26T02:12:29+5:30

अगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का? नगं बाबा येवू तू

Devendra is said to be called, Taty Baale says | देवेंद्र म्हणती येतो, तात्याबाळे म्हणती पळतो

देवेंद्र म्हणती येतो, तात्याबाळे म्हणती पळतो

googlenewsNext

हेमंत कुलकर्णी, नाशिक
बया बया माझ्या गावी, आज परधान आला
परधान कशी म्हणू, राजा तोच रयतेला।।
अशा डौलडांगोऱ्यात, त्येची झाली गावफेरी
असा दादला देरे द्येवा, मनी म्हणतात पोरी।।
-कुसुमाग्रज
अगं बाबो, काय करावं या परधानाला ना त्येला आवतन, ना बिवतन पन सोताच कसा म्हंतो, येऊ का, येऊ का?
नगं बाबा येवू तू ,पाहत्यात ना शरदबाबू -कुसुमाग्रजांची स्वयंघोषित बाळे शुक्रवारी कविश्रेष्ठ कुसमाग्रजांचा जन्मदिन, म्हणूनच राजभाषा दिन आणि म्हणूनच यंदा जनस्थान साहित्य पुरस्कार वितरण दिन. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अनिवासी नाशिककर अध्यक्ष (ही परंपरा अखंडित सुरू आहे़) मधु मंगेश कर्णिक यांच्या हातांनी अरुण साधू यांना जनस्थानाची बाहुली द्यायची आणि कार्यक्रम उरकून घ्यायचा, हा तूर्तास प्रतिष्ठानात मांड ठोकून बसलेल्या आणि कुसुमाग्रजांशी वा त्यांच्या साहित्याशी दूरान्वयानेही संबंध न आलेल्या वा त्यांनीच तो कटाक्षाने येऊ न दिलेल्या कारभाऱ्यांचा मानस. तात्यांनी स्वत:च जनस्थान आणि गोदावरी गौरव या दोन आडसाली पुरस्कार योजना आखून दिलेल्या असल्याने व कुसुमाग्रज स्मारकात संध्याकालीन शीत हवा खाण्याची सोय अबाधित राखायची असल्याने पुरस्कारांचे लोढणे ओढत राहण्याखेरीज कारभाऱ्यांना गत्यंतर नाही. त्यामुळं पटापटा आवरून मोकळे होऊन घ्या, हा त्यांचा व्यावहारिक विचार. पण कसचं काय, यंदा मोठी गडबडच झाली.
मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून डायरेक्ट फोन. कार्यक्रम कोणत्या वेळी आहे, (सायंकाळी सहा म्हणजे सहानंतर कधीही) शीएमसाहेबांना यायचं आहे, जरा वेळ अ‍ॅडजस्ट करता येईल तर बघा. साऱ्या कारभाऱ्यांचे हात कपाळाला. ह्ये काय आता नवंच! अशी काही परंपरा नाय! आम्ही गावभर निमंत्रणं पाठवली, तसं एक मंत्रालयातही पाठवलं. परवाच्या शनिवारी शीएम नाशकात आले, तेव्हा काही लुभ्य्रांनी मधी तोंड घातलं म्हणून टाकणं टाकल्यागत एक पत्र देऊन टाकलं. एरव्ही नाही का, एखाद्यानं येऊ नये असं वाटत असतं, त्याला ऐन वक्ताला आवतन द्यायचं म्हंजे तो यायला नको आणि आपल्यावर बोल नको, तसंच काहीसं. आता आपण टाकलेलं टाकणं हा गडी इतकं मनाला लावून घेईल याची काय कल्पना हो? तिकडं मंत्रालयातही असंच काहीसं झालं असणार. सांस्कृतिक कार्यक्रमांना हल्ली विनोद तावडे भसाभसा जात असतात, तेव्हां मुख्यमंत्र्यांनीही अधूनमधून गेलं पाहिजे, असा सल्ला कोणीतरी दिला असणार. त्यातून तात्यासाहेब ठाऊक नसले तरी उगाच त्यांचं नाव कुणी घेतलं की दोन्ही हातांनी कानाच्या पाळ्या पकडायच्या. मागे मनोहरराव जोशी नाही, वीस वेळा येऊन गेल्यानंतर एकविसाव्या वेळी आल्यावर योगायोगानं तात्यांना भेटले, पण जाहीर भाषणात म्हणाले, नाशकात येऊन तात्यांचं दर्शन घेतल्याखेरीज नाशकातून पायच बाहेर निघत नाही! सांगायचा मुद्दा फडणवीसांना कुणीतरी भरीस घातलं. मुख्यमंत्री वा कोणीही तत्सम व्यक्ती पायी चालली तरी फटके खाणार आणि घोड्यावरून चालली तरी फटके खाणार. तात्यांच्या कार्यक्रमाला फडणवीस आले नाहीत? हेच का त्यांचे साहित्यप्रेम आणि हाच का त्यांना मराठीचा अभिमान? नकोच ते. नाशकात जाऊनच येऊ.
यजमान मात्र कपाळाला हात लावून बसलेले. पाव्हण्याला कसं सांगावं, की बाबा, नको भलत्या फंदात पडू. त्यांचे हात कपाळाला असतानाच ज्यांची बैठक टिळक भवनात आणि उठबैस बारामतीत असते असे एक साहित्यप्रेमी राजकारणी (अस्तंगत होत चाललेली जमात नाही?) तिथे अवतरले. म्हणाले, अरे येड्यांनो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे रयतेचा राजा, तो स्वत:हून येतो म्हणतो आहे ना, मग नाट का लावता? ‘पण पत्रिका तर छापून आणि
वाटूनही झाल्या’, एक कारभारी कळवळला. उठबैसवाल्याने सांगितले, नव्या छापा, नव्याने वाटा, नाही तर राहू द्या, लोकाना कळेलच की. पण आता नाट नको. इतके झाल्यावर बहुधा सारे रडतराऊ घोड्यावर स्वार झाले.
कुसुमाग्रजांनी ‘राजा आला’ ही कविता प्रसवली, तेव्हां पंतप्रधान राजीव गांधी यांचा झालेला नाशिक दौरा त्यांच्या नजरेसमोर होता, असे म्हणतात. या कवितेचा एकूणच भाव (एकूण कडवी १७) तसा गोड नव्हे, तो कडवटच. पण कवितेच्या बाहेरील आणि विशेषत: पुरस्कार वितरण समारंभांच्या आयोजनामागील मुख्य प्रेरक तात्यासाहेब शिरवाडकर वेगळेच होते. प्रतिष्ठानचा असा प्रत्येक कार्यक्रम जुन्या जमान्यातील पाचअंकी संगीत नाटकांसारखा ऐसपैस तर असलाच पाहिजे़ पण तो चित्तचक्षुचमत्कारिकही असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. त्यापायीच की काय कोण जाणे, कार्यक्रमात एखादा व्हीव्हीआयपी असावा़ त्याच्या मागेपुढे कार्बाइनधारींचे कोंडाळे असावे, याची त्यांना आवड होती. त्यामुळे कार्यक्रमाला भारदस्तपणा येतो, अशी काहीतरी त्यांची भावना असावी. मतलब, मुख्यमंत्री आपणहून येत आहेत म्हटल्यावर त्यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक व्यवस्थेच्या चोखपणाची खातरजमा करून घेतली असती. पण आपली बाळं आपल्यासारखी कर्तबगार निघत नाहीत, हे साऱ्याच बापांच शल्य असतं, तेव्हां त्याला तात्यांचा तरी अपवाद का असावा?

Web Title: Devendra is said to be called, Taty Baale says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.