...राज्यात देवेंद्र !
By admin | Published: October 21, 2014 03:01 AM2014-10-21T03:01:24+5:302014-10-21T03:01:24+5:30
‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले.
यदु जोशी, मुंबई
‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्रिपदाचा सर्वात सशक्त दावेदार आहे. त्याचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा गाजतेय. आता तिचे काय होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’.
पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.