देवेंद्र घरी दिवाळी...

By admin | Published: October 29, 2014 12:44 AM2014-10-29T00:44:48+5:302014-10-29T00:44:48+5:30

माध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरे सरसावून तयार...देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर फटाक्यांची लड तयार...संदल आणि वाजंत्रीचे पथकही बाजूलाच प्रतीक्षेत...फडणवीस यांचे जुने मित्र आणि कार्यकर्ते केवळ

Devendra visits Diwali at home ... | देवेंद्र घरी दिवाळी...

देवेंद्र घरी दिवाळी...

Next

फटाक्यांची आतषबाजी: धम्माल नृत्याचे रिंगण
नागपूर :माध्यमांचे प्रतिनिधी कॅमेरे सरसावून तयार...देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर फटाक्यांची लड तयार...संदल आणि वाजंत्रीचे पथकही बाजूलाच प्रतीक्षेत...फडणवीस यांचे जुने मित्र आणि कार्यकर्ते केवळ औपचारिक घोषणेची वाट पाहत रेंगाळत असताना अर्ध्या मिनिटांच्या आत साऱ्यांचेच फोन खणखणले. बस्स...फायनल...देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा...अवघ्या १० सेंकदांच्या आत देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर संदलच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी ताल धरला. महिलांनी फुगडी खेळून आणि रिंगण करून आनंद व्यक्त केला, तर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण दुमदुमविले.
नागपूरकरांचे लाडके आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. गेले काही दिवस त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर होते. नागपूर-विदर्भवासीयांना फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटत असताना सारे वातावरण त्यांच्याच बाजूने असल्याने तेच मुख्यमंत्री होणार हा विश्वासही होता. पण पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाल्याशिवाय त्यांचे नाव अधिकृतपणे समोर आले नव्हते. भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि नागपूरकर जल्लोषात बुडाले. विधिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यावर फडणवीस यांचे चाहते त्यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर मित्रमंडळी आणि चाहत्यांची गर्दी होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. अधिकृत घोषणा होईपर्यंत सारेच शांतपणे घोषणा होण्याच्या प्रतीक्षेत होते. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर उत्साहाला उधाण आले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. पेढे, बर्फी, लाडू वितरित करण्यात आले. फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या परिसरात राहणाऱ्यांनी यावेळी विशेष आनंद व्यक्त केला. यावेळी मिलिंद बाराहाते म्हणाले, संघाच्या शाखेत रोज सोबत असणारा मित्र मुख्यमंत्री झाल्याचा आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नाही. शशांक कुळकर्णी म्हणाले, दिवस असो की रात्र केव्हाही भेटता येणारा माणूस मुख्यमंंत्री झाल्याचा आनंद मोठा आहे. मनीष हारोडे म्हणाले, बालपणापासूनचा मित्र मुख्यमंत्री होणार याचे समाधान आहे. मुख्यमंत्री झाल्यावर भेटणे कठीण होईल, याची खंत वाटते. कुणाल एकबोटे म्हणाले, गेली अनेक वर्षे आम्ही सोबत आहोत. प्रामाणिकपणे काम करणारा आमचा मित्र राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, यासारखे सुख नाही. सातत्याने लोक फडणवीस यांच्या घरासमोर येत होते आणि वाजंत्रीवर नृत्य करून आपला आनंद व्यक्त करीत होते. घरासमोर गर्दी झाल्याने काही उत्साही मंडळींनी चौकात जाऊन फटाके फोडले आणि आसमंत उजळून टाकला. (प्रतिनिधी)

Web Title: Devendra visits Diwali at home ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.