मराठी मनांनी साहित्य परंपरा जपली - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:20 AM2018-01-20T04:20:01+5:302018-01-20T04:20:11+5:30
विदर्भाची भूमी अत्यंत समृद्ध आहे. येथे अनेक गोष्टी पाहायला, अनुभवायला मिळतात. झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार, या आणि अशा साहित्य परंपरा मराठी मनांनी कायम जपल्या आहेत
वणी (यवतमाळ) : विदर्भाची भूमी अत्यंत समृद्ध आहे. येथे अनेक गोष्टी पाहायला, अनुभवायला मिळतात. झाडीपट्टी नाट्य महोत्सव असो वा दंडार, या आणि अशा साहित्य परंपरा मराठी मनांनी कायम जपल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.
विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित ६६व्या विदर्भ साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. शिरीष देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार तथा स्वागताध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार राजू तोडसाम, आशुतोष शेवाळकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, मुख्य संयोजक माधवराव सरपटवार आदी उपस्थित होते. संमेलनस्थळाला ‘राम शेवाळकर नगरी’ असे नाव दिले आहे.
ऐतिहासिक आणि साहित्य भूमी असलेल्या वणी शहराने अनेक साहित्यरत्न दिली, असे सांगत फडणवीस यांनी प्राचार्य राम शेवाळकर, लोकनायक बापूजी अणे, वसंत आबाजी डहाके यांच्या नावांचा उल्लेख केला. साहित्य हे कल्पनाविलास नाही. साहित्यातून वास्तवता प्रतिबिंबीत होते. समाजनिर्मितीचे कामच साहित्यातून होते. अलीकडे संक्रमणाची अवस्था सुरू आहे.