पंढरपूरमध्ये चेंगराचेंगरीत एक भाविक ठार, अनेक जण जखमी
By admin | Published: July 27, 2015 05:55 PM2015-07-27T17:55:58+5:302015-07-27T18:16:52+5:30
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक जमले असून केवळ एका अफवेमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून एक भाविक मृत्यूमुखी पडल्याचे तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २७ - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक जमले असून केवळ एका अफवेमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली असून एक भाविक मृत्यूमुखी पडल्याचे तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वारकरी जल्लोषामध्ये झेंडे फडकवत असताना झेंड्यामध्ये वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने वीजेचा करंट शिरल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाला जीव गमवावा लागला.
राज्याच्या विविध भागांमधून सुमारे ११ लाख भाविकांच्या मांदियाळी पंढरीत दाखल झाली आहे.वारीला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र सोमवारी अफवा पसरल्याने वारीत काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत एका भाविकाचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विविध धार्मिक यात्रांमधील चेंगराचेंगरीच्या घटना घडल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी आंध्रप्रदेशमधील पुष्करम महोत्सव, पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेगरीची घटना घडली होती.