तुळजाभवानीच्या मंदिरात पुजाऱ्याकडून भाविकाला मारहाण
By Admin | Published: June 9, 2017 04:09 PM2017-06-09T16:09:44+5:302017-06-09T16:09:44+5:30
उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 9 - उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप एका भाविकाने केला आहे. तुळजाभवानीच्या अभिषेकावेळी विवेक पाटील नावाच्या पुजाऱ्याने मारहाण केल्याचा आरोप राजेंद्र विष्णू भोकरे यांनी केला आहे. शुक्रवारी (9 जून ) सकाळी ही घटना घडली आहे.
राजेंद्र भोकरे यांनी घडल्या प्रकाराची रितसर तक्रार तहसीलदारांकडे केली आहे. भोकरेंच्या तक्रारीनंतर तुळजापूर पोलिसातही गुन्हा दाखल झाला आहे. भोकरे हे मूळचे औरंगाबादचे आहेत.
“रांगेत असताना मागच्या लोकांचा धक्का लागल्याने पुढे आलो आणि हातातील दही पडले. तेव्हा पुजाऱ्याने आधी थोबाडात मारली. नंतर माफी मागूनही पुजाऱ्याने मारहाण केली,” असा आरोप राजेंद्र भोकरे यांनी तक्रारीत केला आहे. शिवाय, भोकरे यांनी पुजाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
विठ्ठल मंदिरात भक्ताला पुजाऱ्याकडून मारहाण
यापूर्वी, पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातही एका भक्ताला पुजाऱ्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. पांडुरंगाला हार का घातला, अशी विचारणा करीत मंदिरातील पुजाऱ्याने एका भाविकाला मारहाण केली. अशोक नारायण बंडगे असे पुजाऱ्याचे नाव होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय बन्सी सुसे (४५, रा. आमरापूर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) हे भाविक पहाटे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचले. त्यांनी पांडुरंगाला हार घातला़ तेव्हा पुजारी बंडगे यांनी त्यांना रोखले. यानंतर भाविक व पुजाऱ्यामध्ये वाद झाला. या वादादरम्यान पुजाऱ्याने दत्तात्रय सुसे यांना मारहाण केली. सुसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा केला आहे. या घटनेचीही गंभीर दखल मंदिर समितीने घेतली घेतली असून कारवाई केली जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली होती.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीला हार घालू नये. यासंदर्भात मंदिर परिसरात जागोजागी सूचना फलक लावले आहेत. जे व्हीआयपी येतात, तेही मूर्तीला हार घालत नाहीत. भाविकांनी मूर्तीचे संरक्षण केले पाहिजे. भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने पंढरपुरात येतात. त्यांना कर्मचाऱ्यांनीही अशी वागणूक देऊ नये. भाविकाला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. - संजय तेली,कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती