साईबाबांनी बीडमध्ये नोकरी केल्याचा भक्तांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:44 AM2020-01-22T05:44:55+5:302020-01-22T05:45:31+5:30
श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन पाथरी आणि शिर्डीत वाद सुरू असतानाच आता बीड आणि औरंगाबादजवळील धूपखेडवासियांनी श्रीसाई आमचेही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे.
बिडकीन (औरंगाबाद)/बीड : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन पाथरी आणि शिर्डीत वाद सुरू असतानाच आता बीड आणि औरंगाबादजवळील धूपखेडवासियांनी श्रीसाई आमचेही असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. बीडमध्ये सार्इंनी नोकरी केल्याचा दावा करून बीडकरांनी १०० कोटींची, तर आपले गाव सार्इंची प्रगटभूमी असल्याचे सांगून धूपखेडवासियांनी १५० कोटींचा निधी मागितला आहे.
बीडचे साईभक्त तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विद्यासागर पाटंगणकर म्हणाले, साईबाबा बीडमध्ये होते असा दास गणू महाराजांच्या साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटंगणकर सांगत, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते. ४ ते ५ वर्र्षे ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट देत सत्कार केला होता.
तिकडे औरंगाबादजवळील श्रीक्षेत्र धूपखेडा येथील श्री साईबाबा मंदिर संस्थान, श्री साईभक्त मंडळ तसेच ग्रामस्थसुद्धा आक्रमक झाले असून, या ऐतिहासिक क्षेत्राला निधी जवळपास दीडशे कोटी विकास निधी देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी धूपखेडा येथे श्री साईबाबा मंदिर संस्थान, श्री साईभक्त मंडळ तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली. सार्इंची खरी प्रगटभूमी धूपखेडाच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. धूपखेडा येथे मंगळवारी झालेल्या विशेष ग्रामसभेस श्री साईबाबा ज्यांना प्रथम दिसले ‘त्या’ चाँद पटेल यांच्या पाचव्या पिढीचे वंशज चाँद पटेल व बाबूलाल पटेल हेही उपस्थित होते. त्या काळातील चाँद पटेल यांचा चाबूक त्यांनी जपून ठेवला आहे.
पाथरीकर मुख्यमंत्र्यांना भेटणार : पाथरी (जि़परभणी) : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांची भूमिका जाणून घेतली; परंतु, पाथरीकरांना वेळ दिला नाही़ त्यामुळे पाथरीकरांची भूमिका त्यांच्यासमोर स्पष्ट करण्यासाठी लवकरच श्री साईबाबा जन्मस्थळ विकास कृती समितीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे़ तसा निर्णय मंगळवारी पाथरीत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला़