शिवमंदिरांत भक्तांची मांदियाळी, राज्यभरात उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:16 AM2018-02-14T02:16:18+5:302018-02-14T02:16:39+5:30
महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी राज्यभरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, कुणकेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी राज्यभरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, कुणकेश्वर या प्रसिद्ध शिवमंदिरांत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी सप्तधान्य पूजा, पालखी दर्शन सोहळ्याला भाविकांची मांदियाळी होती. राज्याच्या विविध भागासह गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू , आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून भक्त आले होते.
परळी (जि.बीड) येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठीही मंगळवारी देशभरातून लाखो आले होते. सोमवारी मध्यरात्री १२पासून दर्शनासाठी झालेली गर्दी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कायम होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनीही वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
तसेच वेरुळ (जि. औरंगाबाद) येथील श्री घृष्णेश्वरांच्या दर्शनालाही सोमवारी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी झाली होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पहाटे श्री घृष्णेश्वरांचे दर्शन घेतले. देवगड तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) श्री कुणकेश्वर यात्रेस मंगळवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. विधिवत पारंपरिक पूजेनंतर मुंबईच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव, रेखा भोईर यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हजारो भाविकांनी कुणकेश्वरांचे दर्शन घेतले. यावर्षी यात्रा तीन दिवस चालणार आहे.
भीमाशंकर (जि. पुणे) येथेही पहाटेच्या दर्शनासाठी सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री १२ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, आदींनी श्रींची पूजा केली.