तिरुपतीच्या भक्तनिवासात भाविकांना मिळतेय सोलापुरी चादरींचीच ऊब...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:15 PM2019-11-26T13:15:50+5:302019-11-26T13:20:43+5:30
देवस्थानच्यावतीने भक्तनिवासात राहणाºया भक्तांना पांघरुणाकरिता सोलापुरी चादरींचा वापर होत आहे
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापुरात चादरीचे उत्पादन कमी झाले असले तरी तिची लोकप्रियता अद्याप कायम आहे़ देशाच्या काही भागात अद्याप सोलापुरी चादरींची ऊब जाणवते़ जगविख्यात तिरुमला तिरुपती देवस्थानकडून सोलापुरी चादरींना मोठी मागणी आहे़ देवस्थानच्या वतीने भक्तनिवासात राहणाºया भक्तांना पांघरुणाकरिता सोलापुरी चादरींचा वापर होत आहे़ सोलापुरी चादरी अधिक टिकाऊ, ऊबदार आणि बहुउपयोगी असल्याने देवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातून चादरी खरेदी करत आहे, अशी माहिती टेक्स्टाईल उद्योजक प्रभाकर बुरा यांनी ‘लोकमत’ला दिली़.
तिरुमला तिरुपती देवस्थानात रोज लाखो भक्तगण भगवान बालाजींच्या दर्शनाकरिता येतात़ येथे भक्तांच्या निवासाकरिता हजारो खोल्यांची व्यवस्था आहे़ देवस्थानच्या भक्तनिवासात रोज हजारो भक्त थांबतात़ पर्वताखाली तिरुपती शहर आहे़ आणि पर्वतावर तिरुमला देवस्थान आहे़ या दोन्ही ठिकाणी भक्तांकरिता निवासाची स्वतंत्र व्यवस्था आहे़ विशेष म्हणजे, पर्वतावर बाराही महिने थंडी असते़ पावसाचाही तडाका असतोच. त्यामुळे येथील थंडीपासून बचाव करण्याकरिता जाड आणि ऊबदार अशा सोलापूर चादरीची नितांत गरज असते़ येथील प्रत्येक खोलीत सोलापुरी चादर बघायला मिळते.
देवस्थानकडून डबलपेटी मयूरपंख चादरींना मागणी आहे. मयूरपंख चादरी आलटून पालटून वापरता येतात. येथील चादरी बहुउपयोगी आहेत़ पूर्वी हजारो चादरी येथून जायच्या़ आता ती संख्या कमी झाली आहे़तिरुपती येथील बहुतांश हॉटेलमध्येसुद्धा सोलापुरी चादरींचा वापर होतो़ सोलापुरातील पाच ते सहा चादरी उत्पादकांकडून तिरुमला-तिरुपती देवस्थान चादरी तयार करुन घेते, असे येथील उद्योजकांनी सांगितले.
एक विश्वासाचं नातं...
- देवस्थान गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजकांना फोन आणि ई-मेलवर चादरींचे आॅर्डर देते़ येथील उद्योजक देवस्थानच्या आॅर्डरप्रमाणे आकर्षक, रंगतदार, जाड आणि टिकाऊ चादरींची निर्मिती करतात़ त्यात चादरींच्या किनारपट्टीवर तिरुमला-तिरुपती देवस्थानचा शॉर्टकट नेम टीटीडी अशी छपाई केली जाते़ ७० बाय ९० साईजच्या चादरीची किंमत साधारण अडीचशे ते तीनशे रुपये इतकी असते़ या चादरींचे आयुष्यमान किमान दहा वर्षे असते़ आॅर्डर आल्यानंतर येथील उद्योजक आकर्षक असे पॅकिंग करून कुरिअरद्वारे पाठवतात. आॅर्डर पोहोचताच देवस्थान उत्पादकांच्या खात्यात एनईएफटीद्वारे बिल अदा करते़ देवस्थान आणि येथील उत्पादकांमध्ये एक विश्वासाचं नातं तयार झालं आहे.
तेथेही आव्हाऩ़़
- बुरा सांगतात, सोलापुरी चादरींचा वापर केवळ व्हीव्हीआयपी लोकांकरिता होतो़ सोलापुरी चादरी चांगल्या असल्याने त्याचा वापर केवळ एसी खोलीत होतो़ इतर साध्या खोलीत पानिपतच्या चादरींचा पांघरुणाकरिता वापर होतो़ पूर्वी सर्वच खोल्यात सोलापुरी चादरींचा वापर होत होता़ आता देवस्थानकडून पानिपतच्या चादरींनाही पसंती दिली जात आहे़ सोलापूरच्या तुलनेत पानिपतच्या चादरी स्वस्त असतात़ हलके असतात़ लहान मुलं आणि महिला पानिपतच्या चादरींना पसंती देतात़ विशेष म्हणजे, सोलापुरी चादरींचा वापर केवळ व्हीव्हीआयपी लोकांकरिता होतो़ व्हीव्हीआयपी लोकांनादेखील सोलापुरी चादरींची सवय झाली आहे़