भक्तांचा ‘कर्नाटक’ बस सेवेस प्रसाद
By Admin | Published: February 11, 2017 12:18 AM2017-02-11T00:18:21+5:302017-02-11T00:18:21+5:30
‘एसटी’चे मार्केटिंग कमी पडले : सौंदत्ती यात्रेत ७५ लाखांचा फटका; ३६७ कर्नाटकी बसेसचे बुकिंग
प्रदीप शिंदे---कोल्हापूर --एस. टी.ला तोट्यातून सावरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर उपाययोजना केल्या जातात. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यावर पाणी पडत असल्याचे चित्र आहे. याचीच प्रचिती सौंदत्ती यात्रेसाठी कमी केलेल्या दराचे कोल्हापूर विभागाने व्यवस्थित मार्केटिंग न केल्याने भाविकांनी ३६७ कर्नाटक बसचे बुकिंग केले. परिणामी राज्य परिवहन महामंडळाला सुमारे ७५ लाखांचा फटका बसला. राज्याच्या खेडोपाडी, डोंगराळ, दुर्गम भागांत एस. टी. आजही तेवढ्याच कार्यक्षमतेने आपली सेवा देत असते. आजही सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे एसटी हेच प्रमुख साधन असल्याने सर्वसामान्यांमध्ये आजही तेवढाच जिव्हाळा आहे. तो जपत असताना एस.टी.चा कारभार तोट्यातूनच चालतो. तो भरून काढण्यासाठी कांही उपाययोजना केल्या जातात मात्र, अधिकारी त्याबाबत सजग नसतील तर त्या योजना फक्त कागदावर राहत असल्याचा अनुभव येतो.
कोल्हापूर जिल्ह्णातून माघी सौंदत्ती यात्रेला (पोळ्यांची पौर्णिमा) मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर विभागातील महामंडळाच्या प्रासंगिक करारावर घेतलेल्या एस. टी. गाड्यांचा दर यात्रा कालावधीसाठी कमी केला होता. मात्र ही गोष्ट भाविकांपर्यंत पोहोचविण्यास अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अनेकांनी कर्नाटक एस. टी.ला पसंती दिली. कर्नाटक बसगाड्यांचे दर तेथील प्रशासनाने तत्काळ कमी केले. या गोष्टीचे मार्केटिंग तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन केले.
सौंदत्ती यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या प्रासंगिक करारावरील एस.टी.चे दर कमी केले. मात्र, येथील स्थानिक अधिकारी पुरेशी माहिती भाविकांना देत नाहीत. याउलट कर्नाटकातील अधिकारी महाराष्ट्रातून येऊन त्यांच्या बसगाड्यांची माहिती देतात. त्यामुळेच कोल्हापुरातील भाविकांनी कर्नाटकातील गाड्यांचे बुकिंग केले.
-अच्युत साळोखे (सरचिटणीस, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना)
असा होता दर.....
सौंदत्ती यात्रेला जाताना भाविकांना एस.टी.च्या भाडेवाढीसह खोळंबा आकारासंदर्भात काही अडचणी होत्या. त्या मुंबई येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडल्या होत्या. त्यावेळी रावते यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे त्यांनी एस.टी.च्या प्रासंगिक कराराचा दर प्रति किलोमीटर ४२ वरून ३४ रुपये इतका कमी केला. खोळंबा आकार २० टक्क्यांनी कमी करण्याबाबत सूचना दिली. यात्रेसाठी ५५ आसन क्षमतेच्या गाड्या उपलब्ध करून दिल्या.