शेगाव येथे भक्तांची मांदियाळी!
By admin | Published: March 2, 2016 03:29 AM2016-03-02T03:29:19+5:302016-03-02T03:29:19+5:30
माघ वद्य ७ मंगळवारी श्रीगजानन महाराज यांचा १३८ वा प्रकट दिन शेगावला उत्सव लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. या वर्षी १६५६ भजनी दिंड्यांनी सहभाग नोंदविला.
गजानन कलोरे, शेगाव (जि. बुलडाणा)
माघ वद्य ७ मंगळवारी श्रीगजानन महाराज यांचा १३८ वा प्रकट दिन शेगावला उत्सव लाखो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. या वर्षी १६५६ भजनी दिंड्यांनी सहभाग नोंदविला.
प्रकट दिनानिमित्त हभप विष्णुबुवा कव्हळेकर यांचे कीर्तन झाले. दुपारी १२ वा. सनईच्या सुरात व ‘श्रीगजानन अवलीया अवतरले जग ताराया’च्या निनादात गुलाल, पुष्पाची उधळण करून, श्रींचा प्रकट क्षण भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील, अध्यक्ष व विश्वस्तगण उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी १० वा. महारुद्र स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. संस्थानच्या प्रांगणातून श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज, अश्वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रीहरिहर शिव मंदिर, श्रींचे पकट स्थळ व श्रीमारोती मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
श्रींची पालखी त्या मागे श्रींचे तैलचित्र असलेला मेणा व सुशोभित रथ होता. त्यापाठोपाठ श्रीसंत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भजनी दिंडी, त्यामागे श्रीगजानन इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांची भजनी दिंडी होती. प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी आलेल्या सुमारे लाखो भाविकांना संस्थानच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. (प्रतिनिधी)