नदीला आलेल्या पुरामुळे पाटणादेवी येथे अडकले होते भाविक
By admin | Published: July 10, 2016 07:10 PM2016-07-10T19:10:31+5:302016-07-10T19:10:31+5:30
तालुक्यातील पाटणादेवी येथे पावसामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने दर्शनासाठी आलेले अनेक भाविक रविवारी दुपारी तीन वाजेपासून सुमारे दोन ते अडीच तास अडकून होते
ऑनलाइन लोकमत
चाळीसगाव- तालुक्यातील पाटणादेवी येथे पावसामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने दर्शनासाठी आलेले अनेक भाविक रविवारी दुपारी तीन वाजेपासून सुमारे दोन ते अडीच तास अडकून होते काही युवकांनी वेलीचा आधार दिल्यावर भाविकांना पूल पार करता आला. परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे डोंगरी नदीला पूर आल्याने मंदिराकडील मार्गावर असलेल्या पुलावरुन पाणी वाहू लागले. गुडघ्याच्यावर हे पाणी असल्याने व प्रवाहास वेग असल्याने पूल पार करणे धोकादायक असल्याचे पाहून अनेक भाविक पूर ओसरण्याची वाट पहात होते. बराच वेळ झाला तरी मार्ग मोकळा होत नसल्याचे पाहून येथे असलेल्या तरुणांनी पुढे येत जंगलातील वेलीचा दोरासारखा आधार बनवत भाविकांना पूल पार करण्यास मदत केली. त्यामुळे सायंकाळच्या आत भाविक मार्गस्थ झाले. या भागात थोडा जरी पाऊस झाल्यास डोंगारमुळे नदीस पूर येतो व या पुलावरुन पाणी वाहते त्यामुळे पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.