उरी हल्ल्यातील शहिदांना दिव्यांगांची श्रद्धांजली
By Admin | Published: October 19, 2016 01:08 AM2016-10-19T01:08:32+5:302016-10-19T01:08:32+5:30
दहशतवाद्यांनी भारतावर केलेला उरी येथील हल्ला हा अतिशय भ्याड आहे, या हल्ल्याचा निषेध करीत असून, आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत
पुणे : दहशतवाद्यांनी भारतावर केलेला उरी येथील हल्ला हा अतिशय भ्याड आहे, या हल्ल्याचा निषेध करीत असून, आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत, असे भावोद्गार दिव्यांग व्यक्तींनी मंगळवारी व्यक्त केले. उरी हल्ल्याला मंगळवारी एक महिना झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भारतीय सेनेत कार्यरत असताना अपंगत्व आलेले जवान आणि दिव्यांग व्यक्ती यांनी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौक येथे सायंकाळी ही श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी विविध कारणांनी अपंगत्व आलेले नागरिक आणि भारतीय सेनेच्या गोरखा रायफल रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना अपंगत्व आलेले दोन जवान सहभागी झाले होते. यात नायक सुरेशकुमार कार्की व नायक प्रेमकुमार आले यांचा समावेश होता. दहशतवादाच्या विरोधात सर्व देशांनी एकत्रित यायची आवश्यकता असून, येत्या काळात हे पाऊल उचलायला हवे असेही मत सहभागींनी व्यक्त केले. या वेळी दिव्यांग असलेले दत्तात्रय लखे म्हणाले, भारतीय जवानांनी गोळीला गोळीने उत्तर दिल्याने दहशतवाद्यांची कोंडी झाली आहे. भारताने नुकत्याच केलेल्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वेगळा ठसा निर्माण झाला आहे. यामध्ये जवानांचा मोठा वाटा आहे. या वेळी दिव्यांग नागरिकांबरोबरच आयोजक आकाश कुंभार हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)