डीएफसीसी प्रकल्पबाधितांना घराच्या बदल्यात घर देण्याची तयारी, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 02:38 PM2017-10-11T14:38:04+5:302017-10-11T14:38:52+5:30
दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी खूशखबर असून, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.
मुंबई - दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी खूशखबर असून, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे. प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या तुटपुंज्या नुकसानभरपाईच्या विरोधात खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार बैठका घेऊन तसेच लोकसभेतही हा विषय वारंवार मांडल्यानंतर अखेरीस प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याची तयारी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनने (डीएफसीसी) दाखवली आहे. राज्यभरातील ३२०० प्रकल्पग्रस्तांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने हा प्रश्न लावून धरला आहे. त्यांनी १६ डिसेंबर २०१५ रोजी लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून लोकसभेचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले होते. त्याचप्रमाणे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेशजी प्रभू यांच्याशी २२ मे २०१७, २२ जुलै २०१६, १९ मार्च २०१५ या रोजी पत्रव्यवहार केला. प्रभू यांच्या सूचनेनुसार रेल्वे मंत्रालयाचे अतिरिक्त संचालक अनंत स्वरूप यांच्याशी मुंबईत ३० जुलै २०१६ रोजी प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन बैठकही घेतली होती. विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनाही चार ऑक्टोबर रोजी पत्र पाठवले होते. तसेच, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्याशीही वारंवार पत्रव्यवहार केला होता.
या पाठपुराव्याला अखेरीस यश मिळाले आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा पुन्हा एकदा मांडला. दोन वेगवेगळ्या कायद्यान्वये प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात येत असल्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेत असंतुलन असून ही रक्कम देखील तुटपुंजी आहे. अधिकृत घर असलेल्या घरमालकाला देखील इतकी तुटपुंजी रक्कम देऊ करण्यात येत आहे की, त्या रकमेत आज झोपडे देखील मिळणार नाही, असे खा. डॉ. शिंदे यांनी निदर्शनास आणून देऊन नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्याची मागणी केली.
त्यावर डीएफसीसीचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांना घराच्या बदल्यात घर देण्याची डीएफसीसीची तयारी आहे. महाराष्ट्रात एकूण ३२०० प्रकल्पबाधित असून यासंदर्भात सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. घराच्या बदल्यात घर मिळाल्यामुळे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्याही तक्रारी निकालात निघणार असून प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.