पोलीस महासंचालकांनी अखेर बदल्यांचे आदेश फिरविले
By admin | Published: June 9, 2016 05:43 AM2016-06-09T05:43:51+5:302016-06-09T05:43:51+5:30
पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्यांचे आदेश अखेर महासंचालक कार्यालयाने फिरविले आहेत.
यवतमाळ : पोलीस निरीक्षकांच्या मुदतपूर्व बदल्यांचे आदेश अखेर महासंचालक कार्यालयाने फिरविले आहेत. ‘मॅट’च्या आदेशावरून १४ अधिकाऱ्यांना पूर्वपदावर नियुक्त करण्यात आले आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाने २४ व २६ मे रोजी राज्यातील सहायक निरीक्षक, पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, या याद्या वादग्रस्त ठरल्या. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेषत: ७० पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी सर्वाधिक वादग्रस्त ठरली. या यादीतील अर्ध्याहून अधिक पोलीस निरीक्षकांनी ‘मॅट’च्या (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. ‘मॅट’नेही त्यांच्या बदलीला स्थगनादेश देताना पूर्वपदावर कायम ठेवण्याचे आदेश दिले.
‘मॅट’च्या आदेशाच्या अधीन राहून पोलीस महासंचालक कार्यालयाने ४ जून रोजी १४ पोलीस निरीक्षकांना पूर्वपदावर कायम ठेवत असल्याबाबतची पहिली यादी जारी केली. हे सर्व अधिकारी पुणे पोलीस आयुक्तालयातील आहेत. त्यातील काहींना लोहमार्ग, सीआयडी, नागपूर शहर, अमरावती शहर, वर्धा, राज्य गुप्तवार्ता विभाग येथे पाठविण्यात आले होते. मात्र, आता त्यांना पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा नेमणुका देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
>नामुष्कीची वेळ : एकूण ७० अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीतील
४० ते ५० अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये जाऊन स्थगनादेश मिळविण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या पूर्वपदावर नियुक्त्या करण्याची नामुष्की पोलीस महासंचालक कार्यालयावर आली आहे.
>गृह जिल्ह्याचा नियम डावलला
सेवानिवृत्तीची एक-दोन वर्षे शिल्लक असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या गृहजिल्ह्यात बदली देण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, सहायक निरीक्षक व निरीक्षकांच्या बदल्यांच्या वेळी हा आदेश डावलला गेला. अनेकांनी संबंधित वरिष्ठांच्या प्रत्यक्ष पेशीत जाऊन विनंती करूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
अशा अधिकाऱ्यांची संख्या ४० ते ४५ पेक्षा अधिक आहे. सेवानिवृत्ती तोंडावर असल्याने निवृत्तीचे लाभ मिळण्यात अडचण निर्माण होण्याच्या भीतीने या अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये जाणे टाळले, हे विशेष.