'धनगर आरक्षणाच्या अहवालाला 3 महिने झाले, अद्याप एटीआर का नाही?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 03:41 PM2018-11-29T15:41:32+5:302018-11-29T15:43:21+5:30
धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन 3 महिने झाले आहेत. मात्र, सरकारने याबाबत अद्याप एटीआर का आणला नाही, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबई : बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, विधानपरिषदेत धनगर आरक्षणावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन 3 महिने झाले आहेत. मात्र, सरकारने याबाबत अद्याप एटीआर का आणला नाही, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनगर आरक्षणावरून सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आला.
धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजालाही लवकरच आरक्षण देणार असल्याचे सांगितले. धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहेत, त्या पद्धतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करु, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी मी विनंती करतो. धनगर आरक्षणाचा एटीआर आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत सादर करु, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज विधानपरिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. या आरक्षणासाठी लढा देणा-या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणा-या सर्वांचे मी आभार मानतो. #मराठाआरक्षण
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 29, 2018