धनगर आरक्षणासाठी योग्य अहवाल पाठविणार
By admin | Published: January 11, 2016 02:43 AM2016-01-11T02:43:57+5:302016-01-11T02:43:57+5:30
धनगर आरक्षणासंदर्भात सरकारच्या धोरणाबद्दल विरोधकाकडून शंका घेतली जात असली, तरी आरक्षणाचा योग्य अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अनुराग पोवळे, माळेगाव (नांदेड)
धनगर आरक्षणासंदर्भात सरकारच्या धोरणाबद्दल विरोधकाकडून शंका घेतली जात असली, तरी आरक्षणाचा योग्य अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे धनगर समाज जागर मेळाव्याच्या उद्घाटनानंतर सांगितले.
आधीच्या सरकारने नकारात्मक अहवाल पाठविल्यामुळे, धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याचाही दावा त्यांनी केला. आरक्षणासाठी धनगर समाजाने अनेक वर्षे संघर्ष केला आहे़, त्यात आम्हीही सहभागी होतो. सत्तेत येताच आरक्षण देऊ, अशी घोषणा आम्ही केली होती़ त्यानुसार, आरक्षणाचा विषय हाती घेतला़ कायदेशीर बाबी तपासल्या़ त्यात धनगड व धनगर हे एकच समाज असल्याचे स्पष्ट झाले आहे़ आधीच्या सरकारने शिफारस करताना नकारात्मक अहवाल दिला होता़ त्या मुळे आम्ही शिफारस केली असती, तरी प्रश्न सुटला नसता़ १९७८-७९ मध्ये सकारात्मक अहवाल पाठविला होता़ मात्र, २०१०-११ मधील अहवालामुळे तो निकालात निघाला आहे़ त्यामुळे समाजातील सर्व नेत्यांशी चर्चा करून घटनेतील तरतुदीनुसार नवा अहवाल तयार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले़
धनगर आरक्षणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नेते घाबरले आहेत़ आरक्षणामुळे अनेक मतदारसंघही बदलणार आहेत़ त्यामुळे त्यांच्याकडून सरकारविरोधी वातावरण तयार केले जात असल्याची टीका त्यांनी केली़ लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांच्या लोहा दौऱ्याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी दिलेला शब्द खरा केला जाईल, असेही फडणवीस म्हणाले़
पंधरा वर्षांपासून नागपुरात कोणत्याही मोर्चाला मुख्यमंत्री सामोरे जात नाहीत, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा नियम येथे पाळला जातो़ धनगर आरक्षणासंदर्भात त्याच दिवशी विधानसभेत निवेदन केले, असे ते म्हणाले.
माळेगाव यात्रेच्या नियोजनाची गरज असल्याचे आ़ अनिल गोटे यांनी सांगितले़ माळेगाव यात्रेच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ५ कोटी रुपये दिल्याचे सांगताना आणखी निधीची गरज असल्याचे, आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. संयोजक गणेश हाके यांनी धनगरांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले़ आ़ हेमंत पाटील, आ़ सुभाष साबणे, आ़ तुषार राठोड, आ़ सुधाकर भालेराव, खा़ संजय जाधव, माजी आ़ गोविंद केंद्रे आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)