धनंजय मुंडेंसह १११ जण ‘वाँटेड’!
By admin | Published: July 12, 2016 04:08 AM2016-07-12T04:08:12+5:302016-07-12T04:08:12+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात विशेष पथकाने सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात विशेष पथकाने सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित आणि खा. रजनी पाटील यांच्यासह १११ जणांना वाँटेड घोषित केले आहे.
जिल्हा बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात १३१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १२८ गुन्ह्यांचा अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे, तर ३ गुन्हे प्रलंबित होते. त्याचा तपासही विशेष पथकाने सोमवारी पूर्ण करून केज येथील विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई येथील अंबा सहकारी साखर कारखाना व संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीच्या संचालकांच्या विरोधात नव्याने गुन्हे दाखल केले.
२८ जून रोजी विशेष पथकाने यातील सर्व आरोपींना नोटीस पाठवून जबाबासाठी हजर राहण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार ८३ जणांचे जबाब नोंदविण्यात आले. दोषारोपपत्र दाखल करतेवेळी त्यांना न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २९९प्रमाणे या सर्वांना वाँटेड जाहीर करण्यात आले. दोषारोपपत्रासोबतच न्यायालयात कलम ८२प्रमाणे फरार घोषित करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.
विशेष पथकाने केलेल्या तपासाचा अहवाल १३ जुलै रोजी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेले आहेत. त्यापूर्वीच दोषारोपपत्र सादर करून विशेष पथकाने तपास पूर्ण केला आहे. नोंदविलेले जबाब, दोषारोपपत्र व तपासाच्या अनुषंगाने सर्वंकष अहवाल विशेष पथक खंडपीठात सादर करणार आहे. (प्रतिनिधी)
कुणकुण लागताच आरोपी दिंडीत!
या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असल्याची कुणकुण लागताच काहींनी आपले मोबाइल बंद ठेवले होते, तर काही जण ‘आउट आॅफ कव्हरेज’ होते. पोलिसांची पथके काहींच्या घरी गेली तेव्हा ‘ते घरी नाहीत, दिंडीत गेले आहेत,’ असे उत्तर मिळाल्याचे सूत्रांनीआरोपींच्या शोधार्थ २७ पथके रवाना केली होती. त्यापैकी १० पथके जिल्ह्याबाहेर, तर १७ जिल्ह्यात फिरत होती; मात्र त्यापैकी एकालाही यश आले नाही. पथकातील काही अधिकारी आरोपींच्या पुणे, मुंबई येथील निवासस्थानी जाऊन आले.
फरार नाही; विदेश दौऱ्यावर - मुंडे
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेतीविषयक अभ्यास दौऱ्यासाठी मी विदेशात आहे. याची माहिती पोलिसांना आहे. मी फरार असण्याचा प्रश्नच नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड बँकेकडून जगमित्र सूतगिरणीने घेतलेल्या कर्जप्रकरणाच्या तपासास नेहमीच सहकार्य केले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मालमत्तांवर टाच
गुन्ह्यांतील थकबाकीदारांच्या मालमत्तांवर लवकरच टाच येणार आहे. पोलिसांनी बँकेचा पैसा परत मिळविण्यासाठी सर्व थकबाकीदार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी महसूल व इतर संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.
क्रिमिनल लॉ अमेंडमेंट आॅर्डिनन्स १९४४नुसार ही कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक पारसकर यांनी सांगितले. थकबाकीदारांमध्ये बड्या राजकीय मंडळींचाही समावेश आहे.
थकबाकीदार संस्थांच्या संचालकांसह जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांनाही पैसे न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
२६८० पानांचे दोषारोपपत्र
विखे पाटील सहकारी साखर कारखाना, अंबा सहकारी साखर कारखाना, जगमित्र नागा सूतगिरणी हा घोटाळा ३२ कोटींचा आहे. अनुक्रमे १०९०, ३५९ व १२३१ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. वाढलेल्या आरोपींच्या गुन्ह्यांत ४०९, ४१८ ही कलमे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा
१० वर्षे शिक्षा होऊ शकते.