Dhananjay Munde: 'राज्यपालांना महापुरुष नकोय, राष्ट्रगीतही नकोय'; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 02:26 PM2022-03-03T14:26:57+5:302022-03-03T14:27:15+5:30
Dhananjay Munde: 'देशात आतापर्यंतच्या कुठल्याही राज्यपालाने असे कृत्य केले नसेल.'
मुंबईः आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने तीव्र निषेध व्यक्त केला. राज्यपालांनी आपले अभिभाषण अर्ध्यावर सोडले आणि नंतर राष्ट्रगीतालाही उपस्थित राहिले नाही, यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्या कृत्यावर आक्षेप घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj)यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांचा धिक्कार असो, अशा घोषणाही सरकारतर्फे देण्यात आल्या.
धनंजय मुंडेंचे टीकास्त्र
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधिमंडळात अभिभाषण पूर्ण केलं नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. राज्यपालांचे अभिभाषण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सगळ्यात मोठा गाभा असतो. महाराष्ट्राला राज्यपालांच्या अभिभाषणातून सरकारची दिशा लक्षात येते. राज्यपालांनी अभिभाषण न करता ते पटलावर ठेवलं, भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अभिभाषण न करता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. याची सुरुवात भाजपच्या सदस्यांनी केली, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
महापुरुष-राष्ट्रगीत नकोय
मुंडे पुढे म्हणाले की, या राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राची जनता माहीत नाही. महाराष्ट्राची संसदीय कामकाज आणि नियम माहीत नाहीत. त्यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत. त्यांना अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय. एवढंच नाही तर त्यांना देशाचे राष्ट्रगीतही नकोय. हे असं कृत्य आजपर्यंत देशाच्या संसदीय कामात कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यपालांनी घेतला काढता पाय
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण करत असताना सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी आपले अभिभाषण अर्ध्यावरच सोडून राज्यपालांनी तेथून काढता पाय घेतला. राज्यपालांनी भाषण अर्धवट केलं आणि त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रगीतालीही ते थांबले नाहीत. यावरुनही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.