'स्टीकर छापण्यासाठीच पूरग्रस्तांच्या मदतीस उशीर'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:10 PM2019-08-10T13:10:38+5:302019-08-10T13:10:49+5:30
आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा स्लेफी व्हिडिओ आणि पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो यामुळे सरकार विरोधात मोठी नाराजी पहायला मिळत आहे.
मुंबई - कोल्हापूर अन् सांगलीतील पूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. मात्र, स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या सरकारने चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत दिली असल्याचे समोर आले आहे. यावरूनच विरोधकांनी आता सरकारवर जोरदार टीका सुरु केली आहे. स्टीकर छापण्यासाठी वेळ लागल्यानेच पूरग्रस्तांना २ दिवस उशिरा मदत मिळाली असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीची प्रयत्न केले जात आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना, सरकार चक्क जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत करत आहे. सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत आहेत. यावरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. सरकारला जाहिरातबाजी करण्यासाठी स्टीकर छापायला वेळ लागल्यानेच पूरग्रस्तांना २ दिवस उशिरा मदत मिळाली असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
सरकारची प्राथमिकता पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी की स्टीकर छापण्यासाठी ? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. पूरग्रस्त ठिकाणी अनेक कुटुंबातील लेकरं-बाळं उघड्यावर पडली आहे. मात्र मुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दखवत असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केला.
सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला. स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल २ दिवस मदत दिली नाही. लेकरं-बाळं उघड्यावर पडलीत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजी पायी उपाशी माराल लोकांना. #सेल्फिशसरकारpic.twitter.com/9LkcRCPbfl
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 10, 2019
आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा स्लेफी व्हिडिओ आणि पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो यामुळे सरकार विरोधात मोठी नाराजी पहायला मिळत आहे. तर सोशल मिडीयावर भाजपला नेटकरी मोठ्याप्रमाणात ट्रोल करत आहे.