चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 05:31 PM2019-08-06T17:31:36+5:302019-08-06T17:42:52+5:30
भाजप आणि शिवसेनेने 'मीच' मुख्यमंत्री राहणार हे मिरवण्यासाठी यात्रा काढल्या आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेनंतर आता राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवस्वराज्य यात्रेत बोलताना विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. महाजनादेश यात्रा ही चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा आहे. असे म्हणत त्यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, भाजप आणि शिवसेनेच्या यात्रानंतर आता राष्ट्रवादीची सुद्धा यात्रा आजपासून सुरु झाली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन खासदार अमोल कोल्हे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या यात्रेला सुरवात केली. तर यावेळी मुंडे यांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाना साधला. भाजप आणि शिवसेनेने 'मीच' मुख्यमंत्री राहणार हे मिरवण्यासाठी यात्रा काढल्या आहे. तर भाजपची महाजनादेश यात्रा ही चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा असल्याचा टोला मुंडे यांनी यावेळी लगावला.
महाजनादेश यात्रा ही 'चालू' मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा आहे. मुळात ती महा’धना’देश यात्रा आहे. मीच मुख्यमंत्री राहणार हे मिरवण्यासाठीची यात्रा आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीची आहे. आपली #शिवस्वराज्य_यात्रा मात्र जनतेच्या हितासाठी आहे. pic.twitter.com/1qWmTjRVLE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 6, 2019
छत्रपति शिवाजी महाराज यांचा भाजप-शिवसेनेच्या सरकारने वेळोवेळी अपमान केला आहे. छत्रपतींच्या स्मारकाची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यांच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफीही फसवी निघाली. खोटं बोला पण रेटून बोला हा मुख्यमंत्र्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप सुद्धा यावेळी मुंडे यांनी केला.