पंकजाताईंकडून दिवळीच्या शुभेच्छा आल्या का? भाऊ धनंजय म्हणतात…
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 05:56 PM2021-11-05T17:56:31+5:302021-11-05T17:56:37+5:30
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले.
बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदाबाग या निवासस्थान दरवर्षी दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी राज्यातील विविध ठिकाणावरुन राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते पवार कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत असतात. यंदाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते गोविंदबाग येथे आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंनापंकजा मुंडेंकडून शुभेच्छा आल्या का ? असा प्रश्न विचारला,त्यावर धनंजय मुंडेंनी माध्यम प्रतिनिधींची चांगलीच फिरकी घेतली.
शुभेच्छा आल्या नाहीत
शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्रितपणे बारामतीत दरवर्षी दिवाळीचा सण साजरा करतात आणि पाडव्याला सर्व हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही बारामतीमध्ये येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मीडियाशी बोलताना पंकजा मुंडेंकडून शुभेच्छा आल्या का ? या प्रश्नावर म्हणाले की, पंकजाताईंकडून अद्याप तरी दिवाळीच्या शुभेच्छा आलेल्या नाहीत, तुमच्याकडे आल्या असतील तर मला सांगा, अशी फिरकी त्यांनी घेतली.
शरद पवारांर वैयक्तिक हल्ले
मुंडे पुढे म्हणाले की, शरद पवार हे शक्तीपीठ आहे. त्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आम्ही तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही पवारसाहेबांवर होणारे वैयक्तिक हल्ले रोखू. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण खालच्या पातळीला जाऊन ते आरोप प्रत्यारोप होऊ नयेत, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
गोविंदबागेत अजितदादांची अनुपस्थिती
दरवर्षी प्रमाणे यंदाही बारामतीच्या गोविंदबागेत पवार कुटुंबियांनी हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतल्या. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात. पण या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीबाबत स्वतः शरद पवार यांनी खुलासा केला. अजित पवारांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे, खबरदारी म्हणून अजित पवार आले नाही, असे ते म्हणाले.